‘साफ सफाई’चा बहाणा… आणि घरफोडीचा साजरा ‘खेळ’! शाहूपुरी पोलिसांचा क्लीन स्वीप!
कोल्हापूर |
शहरातील शाहूपुरी पोलिसांनी दोन घरफोडींचा सुगम तपास करत तब्बल १२.५ तोळे सोन्याचे दागिने (मूल्य १० लाख रुपये) हस्तगत करत दोन आरोपींना गजाआड केले. विशेष म्हणजे, या प्रकरणात घरकाम करणारी महिला आणि तिचा पुरुष मित्र असे ‘क्राईम कपल’च पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
विश्वासघाताने सुरुवात — ‘घरकाम करणारी’ ठरली मुख्य आरोपी
घटना साईक्स एक्स्टेन्शन परिसरातील ‘सिद्धविनायक हाइट्स’ येथे २५ मे ते ३ जूनदरम्यान घडली. फिर्यादी वृषाली पिसे यांच्या घरातून ६.८० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. तपास करताना पोलीस संशयाच्या आधारे घरकाम करणारी गायत्री अनिल पाटील (४०) हिला ताब्यात घेतले आणि तिच्या चौकशीत खळबळजनक माहिती समोर आली.
गायत्रीने चोरी कबूल करत मुद्देमाल आपल्या मित्र सुनील संभाजी जाधव (४२) याच्याकडे दिल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना अटक केली.
एक गुन्हा शाेधताना —दुसऱ्या घरातील चाेरी झाली उघड
अटक केल्यानंतर त्यांच्या ताब्यातून ८.५ तोळे दागिने हस्तगत झाले. मात्र, चौकशीत अजून एक धक्का बसला — गायत्रीच्या घरी पोलिसांना ४ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या सापडल्या. विचारणा केली असता, तीने त्या दुसऱ्या एका घरातून चोरल्याचे मान्य केले. त्यामुळे दुसरा गुन्हा तिच्यावर नाेंदविण्यात आला.
सजग पथकामुळे कारवाई शक्य
या तडाखेबंद कारवाईचे सूत्रधार ठरले पोलीस निरीक्षक संतोष डोके. त्यांना साथ दिली विशेष पथकाने. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धिरजकुमार, आणि उपविभागीय अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्विरीत्या पार पडली. कारवाईमध्ये पीएसआय आकाश जाधव, मिलिंद बांगर, बाबा ढाकणे, सुशिल गायकवाड, सनिराज पाटील, अमोल पाटील या अधिकाऱ्यांचा मोलाचा सहभाग होता. सध्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव करत आहेत.
०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
विश्वासाच्या नावाने घरफोडी? — एक ‘न बोललेलं’ संकट
“विश्वासघात की दुर्लक्ष?”
आपल्या घरात रोज येणाऱ्या घरकामाच्या बायका, मोलकरणी, स्वयंपाक करणाऱ्या स्त्रिया यांच्यावर आपण बिनधास्त विश्वास ठेवतो. की-होळ्डरपासून ते लॉकरजवळच्या गोष्टींचा पूर्ण प्रवेश दिला जातो — अनेक वेळा त्यांच्या गरजांमुळे, त्यांच्या ‘घरसदृश’ वागणुकीमुळे.
मात्र, गेल्या काही वर्षांत घरकाम करणाऱ्यांद्वारे किंवा त्यांच्या ओळखीतील व्यक्तीद्वारे घरफोडी, चोरी, फसवणूक यांसारख्या घटना वाढत चालल्या आहेत. अनेकदा घरमालकांना संशय आला तरीही, “लोक काय म्हणतील?”, “बिचारी गरजू असेल”, “वर्षानुवर्षांचा संबंध आहे” — या विचाराने तक्रार दिली जात नाही.
पोलिसांचं म्हणणं : “तक्रार द्यायला घाबरू नका”- शस्त्र म्हणून उपयाेग करू देऊ नका..
शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक संताेष डाेके सांगतात की, अनेकदा चोरी झाली तरी लोक तक्रारच देत नाहीत. हेच आरोपींचं मोठं शस्त्र ठरतं. “जर तुमच्या घरी काम करणाऱ्याविषयी किंवा तिच्या ओळखीच्या व्यक्तीविषयी चोरीचा संशय असेल, तर कृपया पोलिसांशी संपर्क साधा. काहीच कारवाई केली जाणार नाही, असं गृहित धरू नका,” असं आवाहन वरिष्ठ पोलिस अधिकारी करत आहेत. याआधीही अशाच अनेक चोऱ्या घडल्या आहेत. केवळ संबंध.. कामवाली वर्षानुवर्षे आपल्या घरी येते. खाते, पिते. जवळचे संबंध म्हणून तिला सावरून घेतले जाते. मात्र याच संधीचा फायदा काही कामवाल्या स्त्रिया, महिला घेताहेत. हेही तितकेच खरे. आहे. तरी अशा काहीही तक्रार असतील तर पाेलिसांना त्या सांगाव्यात. असे पाेलिसांनी आवाहन केले आहे.
POSITIVEWATCH साठी खास प्रतिक्रीया