कोल्हापुरात ट्रिपलसीट आणि एकेरी मार्गाच्या उल्लंघनावर पोलिसांचा धडक कोस!
१३७ ट्रिपलसीट, १२१ एकेरी मार्ग उल्लंघन – दोन दिवसांत तब्बल ₹२.०२ लाखांचा दंड!
TEAM POSITIVE WATCH :
शहरातील वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या दुचाकी वाहनधारकांवर कोल्हापूर वाहतूक नियंत्रण शाखेने विशेष मोहीम राबवत दोन दिवसांत धडक कारवाई केली आहे. ट्रिपलसीट चालविणाऱ्या १३७ वाहनचालकांवर ₹१,३७,०००/- तर एकेरी मार्गाचे उल्लंघन करणाऱ्या १२१ वाहनधारकांवर ₹६५,५००/- इतका एकूण ₹२,०२,५००/- चा दंड ठोठावण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या आदेशावरून, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम १२ व १३ जून रोजी राबविण्यात आली.
वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई केली असून, या मोहिमेमुळे शहरातील वाहतूक शिस्तीबाबत जनतेत धाक निर्माण झाला आहे.
पावसाळी काळात विशेष सावधानतेचे आवाहन
शहर वाहतूक शाखेकडून सर्व वाहनचालकांना आवाहन करण्यात आले आहे की, पावसाळी हवामानात ट्रिपलसीट किंवा भरधाव वेग टाळावा. स्लीप होण्याची शक्यता अधिक असल्याने दुर्घटना घडू शकतात. तसेच, एकेरी मार्गाचे उल्लंघन ही कायद्याची गंभीर पायमल्ली असून, यामुळे इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो.
कायदा तोडणाऱ्यांना यापुढेही सडेतोड दंड!
शहर वाहतूक शाखेने स्पष्ट केलं आहे की, अशा प्रकारचे नियमभंग रोखण्यासाठी ही मोहीम येत्या काळातही अधिक व्यापकपणे राबविण्यात येणार आहे. नियम मोडणाऱ्यांना कायद्याचा दंड चुकणार नाही.
कायदा तोडणं ही हौस नाही, ती गुन्ह्याची सुरुवात असते!
वाहतूक नियम पाळा – स्वतःच्याच नाही, तर इतरांच्या जीवाचंही रक्षण करा!