कर्नाटकमध्ये भाजपला मिळालेल्या दारुण पराभवावर ट्वीट करत जोरदार टीका
मुंबई – बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या लोकांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकमध्ये भाजपला मिळालेल्या दारुण पराभवावर ट्वीट करत जोरदार टीका केली आहे.
कर्नाटक हे देशातील एक अत्यंत प्रगतिशील राज्य आहे. या राज्यातील जनतेने आज सत्ताधारी भाजपच्या विरोधात कौल देऊन बहुमताने काँग्रेसला सत्तेत आणले असेही जयंत पाटील म्हणाले.
जनतेला भ्रष्टाचार आणि जातीधर्मांत तेढ निर्माण करणारे मुद्दे नको आहेत हे सिद्ध झाले. संपूर्ण देश पादाक्रांत करण्याची भाषा करणारे लोक आज संपूर्ण दक्षिण भारतातून हद्दपार झाले आहेत असा जोरदार टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने कर्नाटक प्रदेश काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे जयंत पाटील यांनी अभिनंदन केले आहे.