पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून कोल्हापूरच्या ३५२ विद्यार्थ्यांचे इस्रोकडे उड्डाण…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

नाविन्यपूर्ण योजनेतून पहिलाच उपक्रम… विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही संधी निश्चितच प्रेरणादायी

कोल्हापूर प्रतिनिधी (विनायक जितकर) – कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अभिमानास्पद व प्रेरणादायी असा उपक्रम राबविण्यात येत असून, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या राज्यातील पहिल्याच उपक्रमात ३५२ विद्यार्थ्यांचा इस्रो अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी ६० लाख रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात शुक्रवार दिनांक ९ जानेवारी रोजी विद्यार्थी रवाना होतील.

या दौर्‍यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांचा प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील समाजकल्याण विभाग अंतर्गत येणाऱ्या ४ अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या मसुदमाले ( पन्हाळा ), गगनबावडा, शिरोळ व राधानगरी येथील निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच खाजगी शाळांतील विद्यार्थी, विद्यार्थीनींचा समावेश आहे.

अभ्यास दौर्यातील विद्यार्थ्यांना इस्रोमधील अंतराळ संशोधन, उपग्रह निर्मिती, प्रक्षेपण प्रक्रिया तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळणार असून, त्यामुळे विज्ञान व संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळणार आहे. दरम्यान, अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत ३ टक्के निधीतून राबविण्यात येणाऱ्या योजनेतून कोल्हापूर जिल्ह्यातील निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) बेंगळुरू येथील केंद्रास शैक्षणिक अभ्यास दौर्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार हा उपक्रम राबविण्यात येत असून, विद्यार्थ्यांना विज्ञान व अवकाश तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २२ मार्च २०१७ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील समाजकल्याण विभागांतर्गत येणाऱ्या मसुद माले, गगनबावडा, शिरोळ व राधानगरी येथील ४ अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांची पहिल्या टप्प्यातील इस्रो अभ्यास दौर्‍यासाठी निवड करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आलेले विद्यार्थी ९ जानेवारी २०२६ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत थेट विमानाने बेंगळुरू येथील इस्रो केंद्रास भेट देणार असून, केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित केला जाणार आहे. इस्रोसारख्या अग्रगण्य संशोधन संस्थेला भेट दिल्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व, अंतराळ संशोधनातील भारताची प्रगती आणि भविष्यातील संधी यांची जाणीव होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून तसेच सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या विशेष प्रयत्नातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना इस्रोचा अभ्यास दौरा घडवून आणण्याचा ऐतिहासिक उपक्रम साकारत असून, या उपक्रमास समाजकल्याण तसेच जिल्हा परिषद, महापलिका, खाजगी शैक्षणिक संस्थांकडून पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही संधी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.