अस्मानी- सुलतानी संकटांची तीव्रता कमी करण्यासाठी आध्यात्मिक सेवांशिवाय पर्याय नाही..!
मासिक सत्संगात गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांनी साधला संवाद
नाशिक (प्रतिनिधी): निसर्ग आपल्या हातात नाही. मात्र अस्मानी आणि सुलतानी संकटांची तीव्रता कमी करण्यासाठी आध्यात्मिक सेवांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सेवेकऱ्यांनी आता स्वामी महाराज आणि भगवतीची जास्तीत जास्त सेवा करावी असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांनी केले तेव्हा हजारो सेवेकर्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आणि जयजयकार करून गुरुमाऊलींना प्रतिसाद दिला.
शनिवारी (२७ सप्टेंबर) सेवामार्गाचा मासिक महासत्संग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठात मोठ्या प्रतिसादात पार पडला. नवरात्री आणि मासिक सत्संग अशी अपूर्व पर्वणी जुळून आल्यामुळे सेवेकऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. सकाळी भूपाळी आरतीनंतर राष्ट्र,धर्म आणि समाज हितासाठी श्रीदुर्गा सप्तशतीचा सामूहिक पाठ घेण्यात आला. त्यानंतर परमपूज्य गुरुमाऊलींचे अमृततुल्य हितगुज झाले.
सर्वशक्तिशाली आई भगवतीला शरण जा…
दंगे, मोर्चे,वादविवाद, अराजकता याबरोबरच जलप्रलय, भूकंप अशा साऱ्या आपत्तींचा जीवसृष्टीला सामना करावा लागतो आहे. हे दुष्टचक्र कधी संपेल असा यक्षप्रश्न आहे. त्यावर एकच रामबाण उपाय तो म्हणजे भगवतीला शरण जाणे आणि तिची सेवा करणे हा होय. त्यामुळे सेवेकऱ्यांनी आता न थांबता श्रीदुर्गा सप्तशती ग्रंथाची जास्तीत जास्त पारायणे करावीत आणि ही सेवा अखंडित सुरू ठेवावी अशी स्पष्ट आज्ञा त्यांनी केली.
ऑक्टोबरचा सत्संग गाणगापूरच्या दत्तपीठावर
ऑक्टोबर २०२५ चा मासिक महासत्संग गाणगापूर येथील दत्तपीठावर २५ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. सत्संगानिमित्ताने सेवेकऱ्यांसाठी हे चिंतन शिबीर असेल.असेच चिंतन शिबीर पीठापूर आणि नरसोबावाडी येथेही घेण्यात येईल असे गुरुमाऊलींनी स्पष्ट केले. ऑक्टोबरच्या मासिक सत्संगाला येताना बारा लक्ष स्वामी नामाचा गृहपाठ पूर्ण करून जपाच्या वह्या जमा कराव्यात. ज्यांना बारा लक्ष जप दिलेल्या अवधीत पूर्ण करणे शक्य नसेल त्यांनी टप्प्याटप्प्याने ही सेवा पूर्ण करावी असेही गुरुमाऊलींनी नमूद केले. यावेळी गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे, नितीनभाऊ मोरे,आबासाहेब मोरे, ज्येष्ठ सेवेकरी सतीश मोटे हेही उपस्थित होते.