‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाने शिक्षण क्षेत्रात उभारली लोकचळवळ – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हा शिक्षक व ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ पुरस्कार वितरण

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गेल्या दोन वर्षांत केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आता पंजाबमधील बरनाला जिल्ह्याला मागे टाकत देशात प्रथम येण्याचा संकल्प करूया, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. त्यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) तर्फे ‘जिल्हा शिक्षक पुरस्कार २०२४-२५ व २०२५-२६’ तसेच ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ पुरस्कारांचे वितरण उत्साहात महसैनिक दरबार हॉल, कोल्हापूर येथे पार पडले.

पालकमंत्री आबिटकर म्हणाले, पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे. या पुरस्कारामुळे इतर शिक्षकांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची प्रेरणा निर्माण होते. पुढील वर्षीपासून शिक्षक पुरस्कार ५ सप्टेंबर – शिक्षक दिनीच वितरित केले जातील. त्यांनी पुढे सांगितले की, ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाने शिक्षण क्षेत्रात लोकचळवळ उभी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री व तत्कालीन शिक्षण मंत्री यांच्या पुढाकारामुळे या चळवळीला गती मिळाली असून, जिल्ह्यातील शाळा इमारतींच्या विकासासाठी ११० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

कार्यक्रमाला आमदार अशोकराव माने, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. मीना शेंडकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुवर्णा सावंत, लेखाधिकारी अतुल आकुर्डे, पशुसंवर्धन अधिकारी श्री. बाबर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, उपशिक्षणाधिकारी रत्नप्रभा दबडे व रामचंद्र कांबळे, अधीक्षक रवींद्र ठोकळ यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांसह राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार मिळवलेल्या रविंद्र केदार (सरनोबतवाडी) व दत्तात्रय घुगरे (यादववाडी) यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व राज्यगीताने झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

आमदार अशोकराव माने यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन झाले आहे. जिल्हा नियोजनातून मिळालेल्या निधीमुळे शाळा अद्ययावत झाल्या असून, आता खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांचा ओढा जिल्हा परिषद शाळांकडे वळत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी प्रास्ताविकात नमूद केले की, कोल्हापूरला चित्रनगरीसोबतच शिक्षणनगरी म्हणूनही देशभरात ओळख मिळाली आहे. मिशन अंकुर, मिशन उत्कर्ष, नो मोर बॅक बेंचर्स, निपुण एआय ॲप, तसेच सर्व शाळांमधील सीसीटीव्ही प्रणाली यांसारख्या अभिनव उपक्रमांनी शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवली आहे. शिक्षक गुणवंत असतील, तरच विद्यार्थी गुणवंत घडतात, असे त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यक्रमात ई-जीपीएफ संगणक प्रणालीचे अनावरण करण्यात आले. या प्रणालीमुळे शिक्षकांचा वेळ वाचणार असून जीपीएफ स्लिप आता मोबाइलवर सहज उपलब्ध होईल. यावर्षी तब्बल एक हजार कोटी रुपयांचे लेखांकन या प्रणालीद्वारे पूर्ण झाले असल्याची माहिती अतुल आकुर्डे यांनी दिली. कार्यक्रमाचा समारोप टाळ्यांच्या गजरात झाला. उपस्थितांनी शिक्षकांच्या कार्याचे आणि जिल्हा शिक्षण विभागाच्या यशाचे कौतुक करत “देशात प्रथम क्रमांक” मिळवण्याच्या संकल्पाला पाठिंबा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मगदुम आणि सविता कुंभार यांनी केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.