कोल्हापूर, :शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानातून जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी नशामुक्तीचा ठाम संदेश दिला. “नशामुक्त युवक हीच देशाची खरी ताकद आहे. नशेमुळे व्यक्तीच नाही तर कुटुंब आणि समाजाचाही ऱ्हास होतो. अपघात आणि गुन्ह्यांच्या मुळाशी व्यसन असते. जन्म आणि मृत्यू यांच्यामध्ये ‘चॉईस’ आहे, आणि तो सद्सद्विवेकबुद्धीने करायला हवा,” असे ते म्हणाले.त्यांनी मिशन झिरो ड्रग, अमली पदार्थविरोधी कायदा याची माहिती दिली. संवाद आणि समुपदेशन नशामुक्तीसाठी महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. संतोष प्रभू (न्यूरोसर्जन) यांनी तरुणांमधील व्यसनाचे दुष्परिणाम स्पष्ट करताना सांगितले की, क्षणिक सुखाकरिता व्यसन न करता कष्टातून टिकणारा आनंद मिळवावा. मद्यपान, धूम्रपान, अंमली पदार्थ हे आरोग्याबरोबरच शिक्षण, अर्थकारण, सामाजिक जीवन उद्ध्वस्त करतात. तसेच मोबाईल आणि सोशल मीडियाचे व्यसनही तितकेच धोकादायक ठरत आहे, असे ते म्हणाले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांनी “फियर ऑफ मिसिंग आऊट” या मानसिकतेमुळे अनेक तरुण व्यसनांच्या आहारी जात असल्याचे सांगितले.
व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी स्वयंपरीक्षण आणि आत्मनियंत्रण नशामुक्तीसाठी अत्यंत गरजेचे आहे, असा संदेश दिला.
कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले, “उत्तम नागरिक होण्यासाठी योग्य पर्यायांची निवड करा. व्यसनाऐवजी पुस्तक वाचन, चांगले छंद, सुदृढ सवयी यांना जोपासा. विद्यापीठ सामाजिक भान जागृत करणाऱ्या उपक्रमांना सदैव प्रोत्साहन देईल.”
या व्याख्यानाला शहर डीवायएसपी प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, प्राध्यापक, समन्वयक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












































