पंचगंगा नदीच्या प्रदूषण प्रश्नी शासन दुजाभाव दाखवत असल्याची जनतेत भावना…
कोल्हापूर – राज्यातील इतर नद्यांचे प्रदूषण दूर करण्यासाठी शासनानं कोट्यवधी रुपयांची तरतूद केलेली असताना कोल्हापूर मधील पंचगंगा नदीसाठी शासन दुजाभाव दाखवत असल्याची भावना येथील जनतेत निर्माण झाली असल्याकडं विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सरकारचं लक्ष वेधलं. याबाबतची लक्षवेधी सूचना आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत मांडली.
कोल्हापुर, इचलकरंजी महानगरपालिका कार्यक्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पंचगंगा नदीत सांडपाणी मिसळते, यामध्ये औद्योगिक सांडपाण्याचे प्रमाण हे अधिक आहे. त्यामुळे या नदीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाले असून या नदीतील जैवविविधता धोक्यात आली आहे. यामुळे कोल्हापुरातील प्रशासनाने या नदीकाठच्या एकूण ८० गावांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सर्वेक्षण करण्याकरिता सुमारे २५२ कोटीचा प्रस्ताव शासनास दिला आहे. मात्र हा प्रस्ताव गेली चार महिने मंत्रालयाच्या लालफितीत अडकून आहे. यावर अद्याप निर्णय झालेला नाही. राज्यातील इतर नद्यांचे प्रदूषण दूर करण्यासाठी शासनानं कोट्यवधी रुपयाची तरतूद केलेली असताना कोल्हापूर मधील पंचगंगा नदीसाठी शासन दुजाभाव दाखवत असल्याची भावना येथील जनतेत निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रस्तावास तातडीने मान्यता देण्याबाबतचा प्रश्न लक्षवेधीद्वारे आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ मध्ये सांडपाणी व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सन २०२४ मधील लोकसंख्या विचारात घेऊन ५००० खालील लोकसंख्येच्या गावांमध्ये सार्वजनिक शोषखड्डा आणि ५००० वरील लोकसंख्येच्या गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन केंद्र, ही कामे घेण्यासाठी प्रकल्प अहवाल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती दिली.
पंचगंगा नदीचे प्रदुषण थांबविण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ८९ गावांच्या सांडपाणी व्यवस्थापनाचे प्राथमिक सर्वेक्षण करण्याकरीता आय.आय.टी. मुंबई यांची नेमणुक केली आहे. सदर गावांतील सांडपाणी व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणे आवश्यक असल्याने जिल्हा परिषदेने रु.२५२.७१ कोटी इतक्या रकमेचा प्रस्ताव १०/१०/२०२३ रोजीच्या पत्रान्वये शासनास सादर केला असून राज्य पाणी आणि स्वच्छता मिशन यांच्या स्तरावर प्रस्तावाची छाननी करण्याची कार्यवाही सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.