विभागीय, जिल्हा व तालुका क्रीडा संकुलांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
कोल्हापूर – जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुले अद्ययावत आणि दर्जेदार बनवा, त्याचबरोबर नवीन बांधकामे करताना क्रीडा वास्तुविशारद नेमून क्रीडा संकुले आकर्षक होतील, याकडेही लक्ष द्या, असे सांगून विभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे निकृष्ट बांधकाम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
पालकमंत्री श्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल तसेच आजरा, राधानगरी व भुदरगड तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक सर्किट हाऊस येथे घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अमल महाडिक, क्रीडा विभागाचे उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, भुदरगड तहसीलदार अर्चना पाटील, राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख, आजरा तहसीलदार समीर माने तसेच समिती सदस्य उपस्थित होते.
पालकमंत्री श्री आबिटकर म्हणाले, शेंडा पार्क येथील जागा जिल्हा क्रीडा संकुलाला उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही जलद करा. विभागीय व तालुका क्रीडा संकुलांचे नूतनीकरण करताना ते आकर्षक व चांगल्या दर्जाचे करा. यासाठी तज्ज्ञ क्रीडा वास्तूविशारद नेमा. क्रीडा संकुल परिसरातील उपलब्ध जागेचा योग्य उपयोग होईल याकडे लक्ष द्या. क्रीडा संकुलातील बांधकामे साचेबद्ध पद्धतीने होणार नाहीत याची दक्षता घ्या. तसेच एकाच इमारतीत अनेक खेळांच्या सुविधा देण्याबाबत विचार करा. जिल्ह्यातील क्रीडा संकुलांना आवश्यक त्या सर्व अद्ययावत सुविधा द्या. भुदरगड तालुका क्रीडा संकुलासाठी जागेची पाहणी करताना खेळाडूंना प्रशस्त मैदान उपलब्ध होण्यासाठी प्रशस्त जागा निश्चित करा. आजरा तालुका क्रीडा संकुलाचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून उर्वरित काम जलद गतीने पूर्ण करा. राज्य शासनाच्या वतीने तालुका क्रीडा संकुलांसाठी 3 कोटी रुपयांचा अधिकचा निधी मंजूर करण्यात येत आहे. या निधीतून तालुका क्रीडा संकुलांमध्ये आवश्यक त्या क्रीडा सुविधा निर्माण करा. खेळाडूंना तालुका स्तरावरच क्रीडा सुविधा उपलब्ध होऊन प्रत्येक तालुक्यात चांगले खेळाडू तयार होणे आवश्यक आहे. भुदरगड, आजरा व राधानगरी तालुका क्रीडा संकुले देखील अधिक सक्षम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
आमदार अमल महाडिक म्हणाले, क्रीडा संकुलांचा प्रस्ताव तयार करताना सर्वसमावेशक आराखडा तयार करावा. तसेच निधीच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने कामे हाती घ्यावीत. कोल्हापूर मधील संभाजीनगर येथे विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे. या क्रीडा संकुलातील कामांची माहिती क्रीडा उपसंचालक माणिक पाटील यांनी दिली. जिल्हा क्रीडा संकुलासाठी शहरातील क्रीडा सुविधा विकसित करण्यायोग्य जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे. यादृष्टीने शेंडा पार्क येथील लेपर कॉलनी व कृषी विभाग यांच्या ताब्यात असलेली एकूण 25 एकर जागेची मागणी जिल्हा क्रीडा संकुलासाठी करण्यात आली आहे. याठिकाणी विभागीय क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या क्रीडा सुविधांशिवाय इतर सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. ही जागा मिळण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल समिती स्तरावर प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली.