गटविकास अधिकारी संदीप भंडारी यांच्या हस्ते कर वसुलीचा शुभारंभ
बिद्री (विनायक जितकर) – राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीत १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत विविध विकासात्मक व जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा प्रमुख उद्देश गावाचा सर्वांगीण विकास साधत स्वच्छता, कर वसुली, पायाभूत सुविधा उभारणी व जनतेच्या थेट सहभागातून शाश्वत प्रगती साधणे हा आहे.
अभियानाचा शुभारंभ गावातील कर वसुली उपक्रमाने करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी संदीप भंडारी यांच्या हस्ते कर वसुलीचा शुभारंभ करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या महसूल वाढीसाठी आणि विकास योजनांना चालना देण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा, असे आवाहन भंडारी यांनी यावेळी केले. गावात स्वच्छता मोहीम, पाणीपुरवठा सुधारणा, कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, महिला बचतगट सक्षमीकरण, डिजिटल ग्रामपंचायत या विविध उपक्रमांना गती मिळत असून ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग विशेष लक्ष वेधून घेत आहे.
यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नागरिक व विविध स्वयंसेवी संघटनांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. अभियानाच्या पुढील टप्प्यात शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवणे, ग्रामसंपर्क सभा, ग्रामविकासासाठी आर्थिक नियोजन अशा उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.












































