तळाशी येथे ह. भ. प. मारूतीराव जाधव गुरुजी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त भव्य कार्यक्रम
बिद्री (विनायक जितकर) – तळाशी ता. राधनगरी येथील संत तुकाराम गाथेचे निरुपमकार व प्रगल्भ समाजसेवक ह. भ. प. मारूतीराव जाधव (तळाशीकर गुरुजी) यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन सोमवार, दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी तळाशी येथे करण्यात आले आहे. या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या ‘जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ह. भ. प. श्यामसुंदर महाराज सोन्नर (वडखेल, ता. परळी, जि. बीड) यांना प्रदान करण्यात येणार आहे.
या सोहळ्याला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार प्रकाश आबिटकर प्रमुख उपस्थित राहून पुरस्कार प्रदान करणार आहेत. तसेच माजी खासदार संजय मंडलिक, डॉ. नंदकुमार मोरे व संपत देसाई यांची मान्यवर उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमादरम्यान पुरस्कार वितरणासह विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांनी मारूतीराव जाधव यांची समाजकार्यासाठीची प्रेरणादायी परंपरा उजाळली जाणार आहे. या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन मारुतीराव जाधव (तळाशीकर गुरुजी) चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.












































