गावकऱ्यांचा जीव धोक्यात – सरपंच शुभांगी कांबळेंचा वनविभागाला थेट इशारा
घुंगुर (ता. शाहूवाडी) — गेल्या काही दिवसांपासून घुंगुर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहाटे शेतात जाणारे शेतकरी, वैराणीला जाणाऱ्या महिला तसेच शाळेत जाणारे विद्यार्थी जीव मुठीत धरून प्रवास करत असल्याची धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेत लोकनियुक्त सरपंच शुभांगी कांबळे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष गावात बोलावून ट्रॅप कॅमेरे बसविणे व विशेष गस्ती पथक तैनात करण्याची कारवाई करून घेतली. मात्र, ही केवळ सुरुवात असून वनविभागाने तत्काळ व ठोस उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
“शहरात बिबट्या दिसताच वनविभाग तत्परतेने हालचाल करतो; मात्र खेडेगावांमध्ये अशी तत्काळ कारवाई होताना दिसत नाही. ग्रामीण नागरिकांचे प्राण कमी किमतीचे आहेत का?” असा थेट सवाल सरपंच शुभांगी कांबळे यांनी उपस्थित केला. बिबट्याच्या वावरामुळे पालकांमध्ये तीव्र चिंता असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर शासन व वनविभागाने या घटनेकडे अत्यंत गंभीरपणे पाहावे, अन्यथा भविष्यात अनर्थ ओढवू शकतो, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी उपसरपंच लताताई सावरे, बाजीराव सावरे, युवराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते संजय खोत, सरदार कांबळे तसेच वनविभागाच्या काजल गावडे, अतुल पाटील व अन्य कर्मचारी उपस्थित होते. घुंगुरमधील ही स्थिती केवळ गावाची नाही, तर संपूर्ण ग्रामीण भागाच्या सुरक्षिततेचा प्रश्न बनली असून प्रशासनाने तात्काळ निर्णायक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.












































