१२ तासांत घरफोडीचा छडा; ३६ लाखांचा ऐवज जप्त
जयसिंगपूर : बीएसएनएल कॉटर्स, जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केवळ १२ तासांत उघडकीस आणत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
१० जुलै रोजी सकाळी फिर्यादी सुनिता दिलीप केरीपाळे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने १७ लाखांचा ऐवज लांबवला होता. गुन्हा दाखल होताच कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक मा. श्री. योगेशकुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार व मा. अपर पोलीस अधीक्षक बी. धीरजकुमार, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या पथकाने तपासाला वेग दिला.
सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणातून संशयिताचा मागोवा घेत पोउनि जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार महेश खोत, महेश पाटील, लखनसिंह पाटील, संजय कुंभार, सागर माने, विजय इंगळे, संदीप बेंद्रे, विशाल चौगले, संजय हुंबे, प्रकाश पाटील, सागर चौगले, राजेश राठोड, राजेंद्र वरंडेकर, अनिल जाधव यांच्या पथकाने कसबा बावडा परिसरात सापळा रचून आंध्र प्रदेशातील राजू रामय्या महादेपल्ली (वय ४६) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून ३५०.३८ ग्रॅम सोन्याचे दागिने, २३८५ ग्रॅम चांदीचे दागिने व इतर मुद्देमाल असा एकूण ३६,७५,४१६ रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपी व मुद्देमाल जयसिंगपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली असून सर्व तपास पथकाचे कौतुक होत आहे.