![]() ![]() |
जुना राजवाडा – नवीन राजवाडा मार्गावर शाही लवाजम्यासह मिरवणूक,हत्ती, घोडे, उंट तसेच खेळाडू व पैलवानांचा समावेश…
लेझीम व ढोल पथकांचा समावेश, पारंपरिक पद्धतीच्या १२ कमानी उभारणार…
कोल्हापूर – कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला यावर्षी महाराष्ट्र शासनाकडून राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून हा उत्सव जागतिक स्तरापर्यंत नेण्याचा मानस ठेवून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दसऱ्यादिवशी नवा राजवाडा (न्यू पॅलेस) ते दसरा चौक व भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावर शाही लवाजम्यासह मिरवणूक काढण्यात येणार आहे. दसऱ्या दिवशी शाही लवाजम्यासह होणाऱ्या पालखी मिरवणूक, शाही मिरवणूक व सीमोल्लंघन सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
दसऱ्याच्या शाही मिरवणुकीत जिल्हा प्रशासनाकडून विविध पारंपरिक लवाजम्याचा समावेश करण्यात आला आहे. भवानी मंडपातून श्री अंबाबाई देवीची पालखी, गुरु महाराजांची पालखी व छत्रपती देवस्थानाची पालखी निघणार आहे. या पालखी सोबत शाही लवाजम्याचा समावेश करण्यात आला असून यात ध्वजवाहक घोडा, दहा घोड्यांचे पथक, दोन हत्ती, एक बग्गी (अब्दागिरी), त्यानंतर ३० मावळ्यांचे पथक, ६० खेळाडूंचे पथक, २०० पैलवान त्यानंतर तिन्ही पालख्या व शेवटी पुन्हा चार उंट असा लवाजमा असणार आहे. याबरोबरच ढोल पथक, लेझीम व धनगरी ढोल पथक सहभागी होवून मिरवणुकीला पारंपारिकतेची जोड देईल. तर नवा राजवाडा ते दसरा चौक या मार्गावर एन. सी. सी, एन.एस.एस, स्काऊटच्या २५०० विद्यार्थ्यांचे पथक स्वागताला उभे राहणार आहे. शाही मिरवणुकीच्या दोन्ही मार्गांवर फुलांचा सडा, रांगोळ्यांनी करवीरकर व पर्यटक हे श्रीमंत शाहू महाराजांचे स्वागत करणार आहेत. भवानी मंडप ते दसरा चौक मार्गावर पारंपरिक पद्धतीने वेगवेगळ्या १२ कमानी उभारल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग व जिल्हा नियोजन समितीच्या वतीने यावर्षी दसरा महोत्सवा अंतर्गत १५ ते २४ ऑक्टोबर दरम्यान सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. आतापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांना कोल्हापूरकरांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला असून मंगळवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी दसऱ्या दिवशी राजेशाही थाटात सीमोल्लंघन सोहळा संपन्न होणार आहे. भवानी मंडपातून ४.३० वाजता पालख्यांची मिरवणुक सुरु होणार आहे. ती शाही लवाजम्यासह दसरा चौकात सायंकाळी ५.४५ वाजता पोहचणार आहे. तर नवा राजवाडा येथून निघालेली शाही दसरा मिरवणुक दसरा चौकात त्याच वेळी दाखल होईल व श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शमीपूजनासह सीमोल्लंघन पार पडेल.
















































