कोल्हापूर गुळाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अपेडा पुढाकारात
गुळ उत्पादकांसाठी निर्यात कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर : कोल्हापूरचा गूळ दर्जेदार असून तो परदेशी बाजारपेठेत लोकप्रिय व्हावा यासाठी निर्यात क्षेत्रातील नवे दरवाजे खुल्या करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कोल्हापूरचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व अपेडा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गूळ निर्यात कार्यशाळा’ नुकतीच उद्यमनगर येथील इंजिनिअर्स असोसिएशनच्या सभागृहात उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाचे उद्घाटन गूळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. विद्यासागर गेडाम यांच्या हस्ते झाले. यावेळी अपेडाचे सहाय्यक व्यवस्थापक पांडूरंग बामने, कृषि विज्ञान केंद्र कनेरीचे प्रा. पांडूरंग काळे, गूळ निर्यातदार दीपक जोशी, बाळासाहेब पाटील, तसेच पणन मंडळाचे अधिकारी ओंकार माने, प्रसाद भुजबळ, सत्यजित भोसले, सुयोग टकले व मोठ्या संख्येने गूळ उत्पादक उपस्थित होते.
कार्यशाळेत डॉ. सुभाष घुले यांनी गूळ उत्पादकांना GI नोंदणीचे महत्त्व स्पष्ट केले. “कोल्हापूरी गूळाची ओळख जागतिक बाजारात निर्माण व्हावी, यासाठी वैयक्तिक गूळ उत्पादकांनी GI अंतर्गत नोंदणी करावी. तसेच अपेडा अंतर्गत उपलब्ध योजनांचा लाभ घ्यावा, जेणेकरून आपल्या गुळाला नवीन बाजारपेठा मिळू शकतील,” असे ते म्हणाले.
अपेडाचे पांडूरंग बामने यांनी गूळ निर्यात प्रक्रियेतील संधी, गरज, GAP प्रमाणपत्र, प्रक्रिया व प्रमाणन याबद्दल सविस्तर माहिती दिली. गूळ उत्पादन आणि प्रतवारी कशी सुधारावी यावर प्रा. पांडूरंग काळे यांनी मार्गदर्शन केले, तर उत्तम प्रतीचा केमिकल विरहित गूळ तयार करण्याबाबत डॉ. गेडाम यांनी मोलाचे विचार मांडले.
निर्यातदार दीपक जोशी व बाळासाहेब पाटील यांनी कोल्हापूरचा गूळ दर्जेदार असल्यास निर्यात वाढवता येईल असे सांगत शेतकऱ्यांनी सेंद्रिय प्रमाणीकरण करण्यावर भर द्यावा, असे मत व्यक्त केले. शेतकऱ्यांनी सेंद्रिय प्रमाणीकरणाबाबत प्रश्न उपस्थित केल्यावर श्री. बामने यांनी अपेडा कडून पूर्ण सहकार्य मिळेल, असे सांगितले.
‘ॲग्री स्टॅक’ योजना – कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
या कार्यशाळेला कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गूळ उत्पादकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. कार्यशाळेनंतर उपस्थितांनी गूळ संशोधन केंद्रातील गुऱ्हाळ गृहाला भेट दिली. या वेळी डॉ. गोविंद येनके यांनी संशोधन केंद्रातील उपक्रमांची माहिती दिली तर डॉ. गेडाम यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार गूळ उत्पादनावर भर देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार माने यांनी केले तर प्रा. पांडूरंग काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.














































