प्रशिक्षणार्थ्यासमवेत विनोद काटकर, राजन डांगरे आदी
कोल्हापूर – डॉ. डी. वाय. पाटील साळोखेनगर कॅम्पस येथे महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची कार्यक्षमता वाढ अर्थात ‘रॅम्प’ योजनेतर्गत ‘दागिने मूल्यांकन व मूल्यमापक’ हा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. कोल्हापूर, पुणे, सांगली व सातारा जिल्ह्यांतील एकूण ४५ प्रशिक्षणार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि डी. वाय. पाटील समूहाच्या कोल्हापूर इंक्युबेशन सेंटर मध्ये झालेल्या सामंजस्य कराराअतर्गत रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, साळोखेनगर येथील कोल्हापूर इंक्युबेशन सेंटर ‘दागिने मूल्यांकन व मूल्यमापक’ या प्राशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
दागिने क्षेत्रातील ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले मुंबई येथील भारतीय रत्न व दागिने संस्थेचे उत्पादन विभागप्रमुख विनोद काटकर यांनी आठ तासांच्या सखोल प्रशिक्षण सत्रामध्ये दागिने व्यवसायातील विविध तांत्रिक पैलूंविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दागिने निर्मिती प्रक्रिया, बनावट दागिन्यांची ओळख, तसेच सोन्या-चांदीच्या दागिन्यांची शुद्धता तपासण्याच्या पद्धती, दागिने निर्मितीतील विविध टप्पे तसेच बनावट दागिने ओळखण्याचे तंत्र सोप्या भाषेत स्पष्ट केले.
हॉलमार्किंग प्रक्रियेची माहिती व कालानुरूप हॉलमार्क चिन्हांमध्ये झालेल्या बदलांची सखोल माहिती त्यांनी दिली. प्रात्यक्षिक सत्रात प्रशिक्षणार्थ्यांना स्पर्शदगड चाचणी आणि घनता चाचणी यांच्या सहाय्याने सोन्याची शुद्धता तपासण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. या प्रक्रियेमुळे प्रशिक्षणार्थ्यांचे गणितीय व विश्लेषणात्मक कौशल्य विकसित झाले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठाच्यावतीने मूल्यमापन परीक्षा घेण्यात आली.
डॉ. डी. वाय. पाटील साळोखेनगर कॅम्पसचे संचालक डॉ. अभिजीत माने म्हणाले की, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला बळकटी देणाऱ्या ‘रॅम्प’ योजनेच्या माध्यमातून आणि उद्योगांच्या बदलत्या गरजांचा विचार करून विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आगामी काळात कृषी, अन्नप्रक्रिया तसेच साखर प्रक्रिया क्षेत्रातही असे रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतील.
कौशल्य विकास समन्वयक राजन डांगरे यांनी उपक्रम आयोजनात महत्वाची भूमिका पार पाडली. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, कुलसचिव डॉ. राजेंद्र तलवारे, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील तसेच कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

















































