केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत ना. प्रकाश आबिटकर यांची राज्यातील आरोग्य व्यवस्थेसंदर्भात दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक
कोल्हापूर प्रतिनिधी – महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि रुग्णकेंद्रित करण्याच्या दृष्टीने केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यात दिल्लीत शुक्रवारी (दि. 1) सविस्तर आढावा बैठक संपन्न झाली. केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून राज्यातील आरोग्य सेवा अधिक गतिमान करण्यासाठी ठोस निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
या बैठकीत महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियान, आयुष्मान भारत, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, तसेच मातृ-बाल आरोग्य योजनांची सद्यस्थिती, अंमलबजावणीतील अडथळे आणि सुधारणा यावर सखोल चर्चा झाली. ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागांतील आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ, उपकरणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी राज्यभरात जनऔषधी केंद्रे आणि अमृत फार्मसींचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आवारात अधिकाधिक औषध केंद्रे सुरू करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे खासगी औषधांवरील अवलंबित्व कमी होऊन रुग्णांच्या खिशावरचा ताण कमी होणार आहे.
राज्याला क्षयरोगमुक्त करण्याच्या दिशेने केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे आक्रमक रणनीती राबविणार आहेत. जिल्हा व तालुका स्तरावर मिशन मोडमध्ये तपासणी मोहिमा, संशयित रुग्णांचे लवकर निदान, उपचारातील सातत्य आणि उपचार पूर्ण होईपर्यंत काटेकोर पाठपुरावा करण्याचा निर्णय झाला. यासोबतच क्षयरोगग्रस्त रुग्णांसाठी पोषण सहाय्य योजना अधिक प्रभावीपणे राबविणे, औषधांचा नियमित पुरवठा आणि डिजिटल ट्रॅकिंग प्रणाली मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे.
आरोग्य पायाभूत सुविधांचे बळकटीकरण
बैठकीत राज्यातील शासकीय रुग्णालयांची क्षमता वाढविणे, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देणे, आरोग्य केंद्रांचे नूतनीकरण तसेच आपत्कालीन सेवा अधिक सक्षम करण्याबाबतही चर्चा झाली. ग्रामीण व दुर्गम भागांतील नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी टेलिमेडिसिन, मोबाईल मेडिकल युनिट्स आणि डिजिटल आरोग्य सेवा अधिक व्यापक करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
केंद्र–राज्य समन्वयातून लोकाभिमुख आरोग्य व्यवस्था
या बैठकीदरम्यान केंद्र व राज्य सरकारमधील समन्वय अधिक दृढ करून निधी, तांत्रिक सहकार्य आणि धोरणात्मक पाठबळ वाढविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. लोकांचा विश्वास जपणारी, सक्षम, पारदर्शक आणि आधुनिक सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उभारणे हेच या प्रयत्नांचे अंतिम उद्दिष्ट असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

















































