विनायक जितकर
महाराष्ट्राच्या दुधाचा ब्रँड बनण्याची क्षमता गोकुळमध्ये – हसन मुश्रीफ
गोकुळच्या विकासात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा, वितरक, कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा – सतेज पाटील
मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वाशी शाखा (नवी मुबंई) येथील विस्तारीकरण व नवीन दुग्धशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री नाम. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते, माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व संघाचे चेअरमन अरुण डोंगळे तसेच संचालक मंडळ यांच्या उपस्थित मुंबई (वाशी) येथे संपन्न झाले.
या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले कि ‘उत्कृष्ट चव आणि उत्तम प्रतीच्या दुधामुळे गोकुळ दूध संघाने मुंबई शहरातील मार्केट कायम ठेवले आहे. आज गोकुळसमोर अमूलचे आव्हान आहे. परराज्यातील ब्रँडचे आक्रमण थोपविण्याची ताकत कोल्हापूरच्या दूध उत्पादकात आहे. ‘उत्तम प्रतीचे दूध, साऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दुग्धजन्य पदार्थ यामुळे गोकुळ दूध संघाने कोल्हापूरपासून मुंबईपर्यंतचे मार्केट कायम ठेवले आहे. मुंबई व परराज्यात मिळून वीस लाख लिटर दूध विक्रीचे गोकुळचे ध्येय आहे. शिवाय परराज्यातील ब्रँडचे आक्रमण थोपविण्याची धमक गोकुळमध्ये आहे. नवी मुंबईत आता दहा लाख लिटर क्षमतेची पॅकेजिंग व्यवस्था सुरू झाली आहे. विस्तारीकरणामुळे गोकुळच्या खर्चात बारा कोटी रुपयांची बचत होईल. यामुळे दूध उत्पादक व कर्मचाऱ्यांना जादा पैसे देऊ शकतो. मुंबई व अन्य ठिकाणी मिळून म्हैशीचे दहा लाख लिटर व गायीचे चार लाख मिळून चौदा लाख लिटरहून अधिक दुधाची विक्री होते. भविष्यकाळात हे वीस लाख लिटरपर्यत वाढवायचे आहे. गोकुळच्या दूध वितरकांनी आता दुधासोबत दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीवरही भर द्यावा. दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. म्हशीच्या दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांपासून संचालक, नेते मंडळीपर्यंत प्रत्येकजण म्हैस खरेदी करत आहेत.
यावेळी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले कि गोकुळच्या विकासात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा, वितरक, कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. गोकुळ हा महाराष्ट्राचा ब्रँड व्हावा यासाठी गेली अनेक वर्षे आम्ही सातत्याने प्रयन्तशील आहोत. बदलत्या परिस्थितीमध्ये जगभर दुधाचे उत्पादन कमी होत आहे. मात्र यामध्ये मार्ग काढण्याचे काम गोकुळ करत आहे. कारण गोकुळचे नेटवर्क उत्तम आहे. दुधाची प्रत, विशेषत: म्हशीचे दूध उच्च दर्जाचे आहे. यामुळे ग्राहक कायम जोडून राहिला. अमूलला टक्कर देण्याची क्षमता फक्त गोकुळमध्ये आहे, हे साऱ्यांना मान्य करावे लागेल. भविष्यकाळात दुधाचे उत्पादन वाढविणे, वीस लाख लिटर संकलन हे आमचे उद्दिष्ट आहे. मुंबईत आणखी १० लाख लिटर विक्री होऊ शकते इतके मार्केट आहे. दर महिन्याला १८० कोटी रुपये गोकुळच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. विस्तारीकरणाच्या माध्यमातून वितरकांना चांगली सुविधा मिळू शकेल. गोकुळचे मार्केट कायमटिकवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू असे मनोगत व्यक्त केले. |
कार्यक्रमावेळी प्रास्ताविक करताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की वाशी शाखेकडील गेल्या ३१ वर्षातील सुयोग्य नियोजन, कार्यक्षम व कुशल वितरण व्यवस्था यामुळे मुंबई शहर, उपनगरे, नवी मुंबई, ठाणे, पालघर, व रायगड जिल्ह्यामध्ये गोकुळ ब्रॅन्डच्या दुधाला दिवसेंदिवस ग्राहकांनकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. संघाच्या सध्याच्या स्वमालकीच्या नवी मुंबई येथील दुग्धशाळेची क्षमता प्रतिदिन ४ लाख लिटर इतकी असताना सध्या प्रतिदिन ५ लाख २५ हजार लिटर इतक्या दुधाचे पॅकिंग व वितरण केले जाते. विस्तारीकरण व नवीन दुग्धशाळेचे काम पूर्ण झाले आहे. येथे आधुनिक मशीनरीची उभारणी केली आहे. जेणेकरून आजमितीस प्रतिदिन १० लाख लिटर दुधाचे पॅकिंग व विक्री करणे शक्य होणार आहे.
यावेळी प्रमुख मान्यवर वैद्यकीय शिक्षणमंत्री नाम. हसन मुश्रीफ, माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, नवी मुंबई (वाशी) व्यवस्थापक दयानंद पाटील, संघाचे डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रटरी प्रदिप पाटील, मुंबई परिसरातील दूध वितरक, संघाचे कर्मचारी आदि उपस्थितीत होते.