मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत जिल्हास्तरीय महिला मेळावा…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

महिला मेळाव्याचे इचलकरंजी येथे आयोजन… कार्यक्रम पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकाऱ्यांकडून आढावा…

कोल्हापूर – राज्यामध्ये महिलांच्या संदर्भात असणाऱ्या शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हयातील जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन इचलकरंजी शहराजवळील कोरोची गावातील मैदानावर रविवार, ३ मार्च रोजी करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचे लाभ महिला लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात अंमलबजावणी यंत्रणांचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी यांनी घेतला. यावेळी त्यांनी मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक सूचना सर्व संबंधित विभागांना दिल्या. खासदार धैर्यशील माने, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अति. जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे, माविम जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे, कार्यकारी अभियंता संजय पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील यांचेसह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत प्रशासनाला आवश्यक सूचनाही केल्या.

राज्याच्या सर्व जिल्हयांमध्ये 2 ऑक्टोबर 2023 पासून 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येत आहे. यानुसार जिल्हयातील ग्रामीण तसेच शहरी भागात महिलांना थेट लाभ देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येत आहे. 3 मार्च रोजी होणाऱ्या मेळाव्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित विभागांना लाभार्थी निवड, कार्यक्रमाचे ठिकाण, आसन व्यवस्था, वाहतूक, सुरक्षा, प्रदर्शनी, मोबाईल टॉयलेटस, आवश्यक वैद्यकीय पथक, अल्पोपहार व पिण्याचे पाणी तसेच मंडप याबाबत आढावा घेतला व आवश्यक सूचना केल्या. प्रत्येक तालुक्यातून महिलांना या कार्यक्रमासाठी बोलविण्यात येणार आहे. या अनुषंगाने एसटी बसेस ची व्यवस्था केली जाणार आहे.  मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध विभाग प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली समित्यांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक नोडल अधिकाऱ्यांवर त्या त्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. इचलकरंजी येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन सज्ज असून हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी आदर्शवत ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी येडगे यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्यात झालेला शासन आपल्या दारी अभियानाचा कार्यक्रम राज्यभरातील सर्वात मोठा आणि आदर्शवत असा ठरला होता, अशा शब्दात कौतुक करुन कोल्हापूर जिल्ह्यात घेण्यात येत असलेला हा महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रम देखील प्रशासकीय यंत्रणेने यशस्वी करावा, असे आवाहन डॉ. अमोल शिंदे यांनी केले.

महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करत आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात. तसेच प्रत्येक महिला लाभार्थी समाधानी होवून परततील, अशा पद्धतीने या कार्यक्रमाचे नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या. कार्यक्रमाच्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था, फिरते स्वच्छतागृह व अन्य नियोजन नीटनेटके करा. कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थ्यांची, मान्यवरांची बसण्याची व त्यांच्या पासेसची व्यवस्था करा. उन्हाची तीव्रता विचारात घेवून लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले. कार्यक्रमासाठी नियुक्त केलेले सर्व नोडल अधिकारी व त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदारी बाबत सविस्तर आढावा घेऊन दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या सूचना देवून सविस्तर मार्गदर्शन केले.

मेळाव्यात मोठ्या संख्येने महिला येणार आहेत. वेगवेगळया योजनांच्या माध्यमातून मिळालेले लाभही त्यांना वितरीत केले जाणार आहेत. तसेच जिल्हयातील निवडक महिलांच्या बचत गटांचे स्टॉल्स या मेळाव्याच्या ठिकाणी लावले जाणार आहेत. यात सर्व महिला सहभागी असतील. जिल्हयातील महिलांनी सुरू केलेल्या व्यवसायांचे महत्व यावेळी उपस्थितांना दिसणार आहे. तसेच इतर शासकीय विभागातील महिलांविषयी असणाऱ्या योजनांचे स्टॉल्सही महिला अधिकारी व कर्मचारी चालविणार आहेत. या महिला मेळाव्यात जणू काही महिला स्त्रीशक्तीचे दर्शनच होणार आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.