जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत कामांचा आढावा
कोल्हापूर – महापालिके अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असून यामध्ये सुधारणा व्हाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत आमदार राजेश क्षीरसागर यांनी केल्या. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या विविध योजना, प्रकल्पांबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक आयोजित केली होती. यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह महापालिकेचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी, झोपडपट्टीतील प्रॉपर्टी कार्डचे वाटप, झूम प्रकल्प, हद्दवाढ, आयटी पार्क, महापालिकेकडून आकारण्यात येणारा घरफाळा, स्ट्रीट लाईट, महापालिकेकडील बंद शाळा, वाहनतळ आदी विषयांबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार क्षीरसागर म्हणाले, शहरातील सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारायचे असेल तर त्यांना आपण विहित नियमानुसार मदत करावी लागेल. झोपडपट्टीमध्ये अनेक प्रलंबित प्रश्न असून शहरातील ६४ झोपडपट्ट्यांमध्ये प्रलंबित प्रॉपर्टी कार्डचे वाटप अजूनही पूर्ण होऊ शकले नाही ते तातडीने पूर्ण करून त्यांना न्याय मिळवून द्या. सेवा रुग्णालयासह परिसरातील लोकांसाठी अडचण निर्माण करणारा झूम प्रकल्प याबाबतही शासनाकडून सूट मिळण्यासाठी प्रस्ताव देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
कोल्हापूर शहरातील हद्दवाढीच्या प्रश्नाबाबत तातडीने आवश्यक प्रस्ताव, अनुषंगिक कागदपत्रे शासनाकडे सादर करा. आयटी पार्कच्या जागेसाठीही त्यांनी यावेळी आढावा घेतला. शहरातील ५१० ठिकाणी ओपन स्पेस आहेत. येथील सर्वेक्षण करून लोकांना आवश्यक असलेल्या सोयी सुविधा देण्यासाठी नियोजन करा. तसेच महापालिकेकडे जमा होणारा घरफाळा यामध्ये १५० कोटी रुपये कमी आकारला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हा घरफाळा स्वरूपात जमा होणारा निधी आल्यास यामुळे विकास कामांमध्ये असणारी निधीची तूट भरून काढता येईल. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी शासनाची परवानगी घेऊन ड्रोन सर्वेक्षण करून नव्या पद्धतीने घरफाळा आकारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या.
कोल्हापूर शहरातील नागरिकांना होत असलेला पाणीपुरवठा हा कमी प्रमाणात आणि वारंवार बंद पडणारा असल्याची तक्रार त्यांनी केली. यासाठी सर्वांना समान न्याय देत सर्व भागात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी योजनांची तपासणी, देखभाल दुरुस्ती वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच महापालिके अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनाबाबत अडचणी आहेत त्या तातडीने दूर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. शहरातील स्ट्रीट लाईट मध्येही समस्या असल्यास त्या दूर कराव्यात अशा सूचना त्यांनी केल्या.
बंद शाळा नव्याने पुन्हा सुरू करता येतील का किंवा बीओटी तत्त्वावर त्या कोणाला चालवण्यास देता येतील का यासाठीही प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वाहन तळाबाबत ही गतीने सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करून बाहेरून येणाऱ्या पर्यटक नागरिकांसाठी चांगल्या सुविधा निर्माण व्हाव्यात असे त्यांनी सुचवले. या प्रकारे सर्वच सुरू असलेल्या व प्रलंबित प्रकल्पांच्या कामांमध्ये सुधारणा व्हाव्यात या पद्धतीच्या सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. यावेळी शिवसेनेचे महानगरसमन्वयक कमलाकर जगदाळे, शहरप्रमुख रणजीत जाधव, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, रमेश पुरेकर, हर्षल सुर्वे आदी उपस्थित होते.