“गुरु म्हणजे दिशा… गुरु म्हणजे दैवत!”
शब्दांकन – विनायक जितकर
भारतीय संस्कृतीमध्ये ‘गुरु’ ही संकल्पना केवळ शिक्षकापुरती मर्यादित नाही, तर ती एक प्रकाशदायी शक्तीचे रूप आहे. जो अज्ञानरूपी अंध:कारात अडकलेल्या शिष्याला ज्ञानाच्या प्रकाशात नेतो – तो म्हणजे गुरु. गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुंच्या स्मरणाचा, त्यांच्या ऋणाची जाणीव ठेवण्याचा, त्यांच्या शिकवणीचे मोल ओळखण्याचा आणि त्यांना नमन करण्याचा आहे.
गुरु म्हणजे कोण?
गुरु म्हणजे केवळ वर्गात शिकवणारा शिक्षक नव्हे, तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर योग्य दिशा दाखवणारा मार्गदर्शक. संस्कृतमधील “गु” म्हणजे अंध:कार आणि “रु” म्हणजे नाश करणारा. म्हणजेच गुरु म्हणजे अज्ञानाचा नाश करणारा! छोट्या वयात शाळेतील शिक्षक, मोठ्या वयात जीवन शिकवणारे आई-वडील, गुरुकुलातील ऋषी-मुनी, आजच्या काळातील तंत्रज्ञान गुरू, स्पिरिच्युअल गुरू, समाजसुधारक, विचारवंत – हे सर्वच आपल्या जीवनातील गुरु आहेत. गुरुपौर्णिमेचा उगम महर्षी व्यासांच्या जन्मदिनी मानला जातो. वेदांचे विभागीकरण करणारे, महाभारत, भगवतगीता यांसारखे ग्रंथ देणारे व्यास ऋषी हे ज्ञानाचे महान स्रोत होते. म्हणूनच त्यांचा स्मरणार्थ हा दिवस ‘व्यास पौर्णिमा’ म्हणूनही साजरा केला जातो.
आधुनिक युगातील गुरूत्त्व –
आजच्या डिजिटल युगातही गुरूंचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट वाढले आहे. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शनाची गरज आहे. अभ्यास, करिअर, नातेसंबंध, मानसिक आरोग्य – या सर्व बाबतीत योग्य गुरू मिळणे हेच यशाचे गमक आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गुरूला वंदन करूया – त्यांनी दिलेले ज्ञान, शिकवलेली मूल्ये, वागणुकीची शिस्त या सर्वांचे स्मरण ठेवून त्यांचे ऋण मान्य करूया. गुरु वंदना हे केवळ परंपरा नव्हे, तर आत्मिक ऋणनिर्देशन आहे. गुरुंचे ऋण कधीच फेडता येत नाही, पण ते मान्य करून त्यांचा आशीर्वाद घेणे हेच खरे गुरुपौर्णिमेचे सार आहे.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥