निमित्त गुरुपाेर्णिमेचे! माझे वडील…हेच पहिले गुरू

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

(गुरुपौर्णिमा विशेष)

आज गुरुपौर्णिमेचा पवित्र दिवस…
संपूर्ण आयुष्यात आपल्याला शिकवणारे, मार्गदर्शन करणारे अनेक गुरू भेटतात, पण माझ्यासाठी माझे वडीलच माझे पहिले आणि खरे गुरू होते. त्यांच्या शिकवणीनेच मला जग जिंकायची उमेद मिळाली. आज १० जुलै… या दिवशीच ३८ वर्षांपूर्वी माझ्या आयुष्याला एक मोठा धक्का बसला. वडिलांचं अचानक जाणं — या एका घटनेने माझ्या संपूर्ण जीवनाला एक नवी दिशा दिली. काही दिवस विसरले जातात, पण काही दिवस कायम काळजात घर करून राहतात. हा दिवस तसाच आहे…

त्या काळात मी नाशिक येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात (पीटीसी) पोलिस उपनिरीक्षक पदासाठी प्रशिक्षण घेत होते. मागे वळून पाहताना जाणवतं, की माझ्या प्रत्येक पावलामागे त्यांच्या आशीर्वादांची सावली होती. त्यांनी दिलेला प्रामाणिकपणा, शिस्त, आणि आत्मविश्वास — हेच खरे माझे शिदूर झाले. आज त्यांच्या आठवणींच्या सावलीतच माझं आयुष्य उभं आहे…

(गुरुपौर्णिमा विशेष)

आज गुरुपौर्णिमेचा पवित्र दिवस…
संपूर्ण आयुष्यात आपल्याला शिकवणारे, मार्गदर्शन करणारे अनेक गुरू भेटतात, पण माझ्यासाठी माझे वडीलच माझे पहिले आणि खरे गुरू होते. त्यांच्या शिकवणीनेच मला जग जिंकायची उमेद मिळाली. आज १० जुलै… या दिवशीच ३८ वर्षांपूर्वी माझ्या आयुष्याला एक मोठा धक्का बसला. वडिलांचं अचानक जाणं — या एका घटनेने माझ्या संपूर्ण जीवनाला एक नवी दिशा दिली. काही दिवस विसरले जातात, पण काही दिवस कायम काळजात घर करून राहतात. हा दिवस तसाच आहे…

त्या काळात मी नाशिक येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात (पीटीसी) पोलिस उपनिरीक्षक पदासाठी प्रशिक्षण घेत होते. मागे वळून पाहताना जाणवतं, की माझ्या प्रत्येक पावलामागे त्यांच्या आशीर्वादांची सावली होती. त्यांनी दिलेला प्रामाणिकपणा, शिस्त, आणि आत्मविश्वास — हेच खरे माझे शिदूर झाले. आज त्यांच्या आठवणींच्या सावलीतच माझं आयुष्य उभं आहे.

मी वडिलांना काका म्हणायचे आणि ते मला सुनील म्हणायचे. तिथेच माझ्या भविष्यातली पाळमुळं रुजली गेली होती असं मला वाटतं. काकांनी माझा पिंड चांगलाच ओळखला होता म्हणून जेव्हा मला कॉलेजला जायचं होतं आणि कोल्हापूरला बसने अपडाऊन करायचं होतं तेव्हा काका म्हणाले, तुला वावगं काही आवडत नाही आणि तू रोज भांडण करून येशील. गाडीत वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत असतात. मी काकांना वचन दिलं की मी कुणाशी भांडणार नाही, पण मला कॉलेज शिकू द्या. मला ग्रॅज्युएट होऊ द्या. मला नोकरी करायची आहे.

तेव्हा आमच्या घरात नोकरीची पार्श्वभूमी नव्हती. चांदीचा उद्योग आणि शेती या दोन्ही धंद्यांमध्ये रमलेले आमचे कुटुंब होते. त्यात मी नोकरीचा हट्ट धरलेला होता. काकांनी मला कॉलेजला घातलं. मी त्यांचा विश्वास सार्थ ठरवत १९८६ साली कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमधून बीकॉम झाले.

सुदैवाने १९८६ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी निघालेल्या जाहिरातीनुसार मी अर्ज केला. मूळची खेळाडू असल्याने मला पास होणं काही अवघड गेलं नाही आणि मी ६ जून रोजी काकांचा निरोप घेऊन नाशिकला जाणाऱ्या सटाणा गाडीत बसले. त्यावेळी काकांचा जो निरोप घेतला तो शेवटचा ठरेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण दुर्दैवाने ते खरं ठरलं आणि १० जुलै १९८७ रोजी काका हृदय विकाराच्या झटक्याने गेले.

मला घ्यायला माझे भाऊजी पीटीसीत आले. त्यापूर्वी दोन दिवस आधी शुक्रवारी काका गेले त्याच दिवशी आम्हांला पीटीसीमध्ये गोड पदार्थ असायचा आणि नॉनव्हेजवाल्यांना नॉनव्हेज असायचं. मी शाकाहारी असल्याने मला गोड पदार्थ दिला होता. खरं म्हणजे गोड पदार्थ म्हणजे माझा आवडीचा विषय. पण त्या दिवशी का कोणास ठाऊक, मला गोड खावेसे वाटलं नाही. मी ते आणून रूममध्ये ठेवलं. रात्री त्याला मुंग्या लागल्या म्हणून दुसऱ्या दिवशी फेकून दिलं. थोड्याच वेळात मला सांगण्यात आलं की तुमचे भाऊजी तुम्हाला भेटायला आलेले आहेत. मी त्यांना भेटायला गेले तर ते मला म्हणाले, सुनिता लगेच आवर. आपल्याला गावी जायचं आहे. माझ्या छाती अचानक धडधडू लागली. म्हटलं, काय झालं? तर भाऊजी म्हणाले, काका आजारी आहेत आणि त्यांनी तुला भेटायला बोलावलेलं आहे. मी म्हटलं, काका असे कधीच बोलवणार नाहीत मला भेटायला. काय झालं सांगा! आणि दुर्दैवाने तो धक्कादायक प्रसंग घडून गेला होता.

शुक्रवारी काकांचा दुर्दैवी अंत झाला होता. मी सटाण्यातून नाशिकवरून सटाणा बसने पुन्हा कोल्हापूरहून हुपरीला येत असताना मला काकांसारखी माणसं गाडीत दिसायला लागली. माझे चुलते जे होते त्यांना आम्ही म्हातारबाबा आणि काकांना त्यांची मुलं काका म्हणायची म्हणून आम्ही मुलं देखील वडिलांना काकाच म्हणत असू. घरी आम्ही वडील, आई, माझ्या आईची आई (आजी), माझ्या वडिलांची बहीण आणि माझा भाऊ आणि आम्ही आठ बहिणी, भावाची बायको, आणि त्याची तीन मुलं, गुरेढोरे असं मोठं खटलं असलेला आमचं कुटुंब. तरीदेखील आम्ही चांदीचा व्यवसाय असताना व शेती असताना सुद्धा अतिशय साध्या घरात राहत होतो. काकांचं म्हणणं असायचं की ज्या मधून आपल्याला परतावा नसतो अशात आपण पैसे खर्च करायचे नसतात. शिवाय एवढ्या मुलींची जबाबदारी देखील होती.

असं माझं बालपण गेलं. आज जेव्हा बालपण आठवतं, तेव्हा काकांचे एकेक गुण आठवतात. एकदा भावाला ते म्हणाले होते, राम, हे शंभर रुपये काँग्रेसच्या शाखेत दे आणि त्यांच्याकडून पावती घेऊन ये. काँग्रेसच्या खर्चासाठी हे पैसे आपण देत असतो. तेव्हा मला काही त्याचा अर्थ कळला नव्हता. पण आज कळतं की कोणत्याही पक्षाला अर्थकारण चालवण्यासाठी निधी लागतो आणि आज आपण त्याचा पक्षनिधी कसा उभा करतो ते पाहतो. असो.

माझे वडील अतिशय दूरदर्शी होते. माझ्या मैत्रिणीला म्हणाले होते, (कल्पना गाटला) तू लॉ केलेले आहेस तर तू जजसाठी परीक्षा द्यावी असं मला वाटतं. त्याप्रमाणे तिनं ते केलं आणि ती जज झाली. काकांचं सामाजिक कार्य देखील दांडगं होतं. त्याकाळी पैसा फंड बँकेमध्ये एक कमिटी होती ज्याच्यामध्ये सामुदायिक विवाहाचे आयोजन केलं जायचं. काका त्या कमिटीचे सभासद होते. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त जोडप्यांचे लग्न मोफत लावून दिलं जायचं व त्यांना संसारोपयोगी वस्तू देत. त्याचप्रमाणे ते ग्रामपंचायतचे पंच असताना देखील त्यांनी अतिशय चांगलं काम केलं होतं. गावामध्ये जेव्हा पण लग्न ठरवण्याचे असेल किंवा वाटणी करण्याची असेल अशी कोणतीही कामे असतील तेव्हा काकांना आग्रहाचं निमंत्रण असायचं की आपण यावं. काकांचा स्वभाव अतिशय रागीट असला तरी प्रांजळ सुद्धा तेवढाच होता. त्यांना गैर काहीच चालत नसे. नेमका हाच गुण माझ्यात सुद्धा आला असं मला वाटतं. त्याचप्रमाणे काका म्हणायचे की धंद्यामध्ये म्हणजे आम्ही जो चांदीचा धंदा करत होतो तो ९७ टंच असलेला म्हणजे फक्त तीन टक्के आवश्यक भेसळ असायची आणि अशा प्रकारे शुद्ध माल आपण ग्राहकांना पुरवला पाहिजे याबाबत ते आग्रही असायचे. जेव्हा कुणाला पूर्ण शुद्ध माल पाहिजे असल्यास आमचे स्पर्धक सांगत की तुम्ही कृष्णाजी कुलकर्णीच्या दुकानात जा तिथे तुम्हाला चोख वस्तू मिळेल. असं काकांनी नाव कमावलं होतं. सर्वजण काकांना के.एस म्हणायचे. कृष्णाजी श्रीपाद कुलकर्णी हे हुपरीच्या चांदी बाजारपेठेतलं एक नावाजलेलं नाव, खात्रीशीर दुकान होते. त्या काळी हुपरीच्या चांदी असोसिएशनतर्फे निवडक कारखानदारांचे चांदी व्यवसायातील वाटचालीचे पुस्तक प्रकाशित केले होते त्यात काकांवर लेख होता. आजही ते दुकान तिसऱ्या पिढीत माझे भाचे चालवत आहेत. वडिलांचे नंतर भाऊ आणि त्यानंतर त्याची मुलं माझे भाचे ते काम सांभाळत आहेत. काका म्हणायचे की कोणताही व्यवसाय करताना त्याच्यामध्ये पत राखावी लागते आणि ती पत म्हणजे आपले वचन असते. आपले बोल राखायचे असतात. अशी पत सांभाळून कुठलाही व्यवसाय करावा असं त्यांचं प्रामाणिक मत होतं. त्यामुळे ते संस्कार आमच्यावर नकळत होत गेले. आपलं बोलणं म्हणजेच आपली पत असते आणि पत म्हणजेच आपलं बोलणं आणि त्याप्रमाणे वागणं याबाबतचे बाळकडू आम्हाला काकांकडूनच मिळाले.

आज वडिलांना जाऊन ३८ वर्षे झाली पण पोलीस ट्रेनिंगला जाताना वडिलांची निरोप घेतानाची मूर्ती आजही जशीच्या तशी मनात जिवंत आहे. काकांची कमतरता जाणवते. म्हणतात ना जे विधिलिखित असतं ते होते. खरतर मी ट्रेनिंगला गेल्यानंतर ठरविलं होतं पहिला पगार झाल्यानंतर त्यांच्यासाठी आरामखुर्ची घेऊ म्हणून. पण माझी ईच्छा अपुरीच राहिली.

पण काका, तुमच्या संस्काररूपी सावलीत मी आजही ताठ मानेने उभी आहे. माझ्या आयुष्याचे तुम्हीच पहिले गुरू. आज गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी तुमच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली.

लेखन: सुनिता नाशिककर
सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक, मुंबई.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.