चित्ररथाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील २२८ गावांमध्ये जनजागृती
कोल्हापूर – यावर्षीच्या जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यासाठी ‘एलईडी चित्ररथांची’ निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये फिरणाऱ्या या चित्ररथांना जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. यावेळी खासदार धैर्यशील माने, समाज कल्याण सहायक आयुक्त सचिन साळे आणि जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ उपस्थित होते.
जिल्हा माहिती कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेले हे चित्ररथ कोल्हापूर जिल्ह्यातील २२८ गावांमध्ये जनजागृती करणार आहेत. गावांसोबतच शाळा, महाविद्यालये आणि निवासी शाळांमध्येही या माध्यमातून माहिती पोहोचवली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, मुला-मुलींसाठीच्या विविध शिष्यवृत्ती, निवासी शाळा योजना, रमाई आवास योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, तसेच गटई कामगार, ज्येष्ठ नागरिक आणि तृतीयपंथीयांसाठीच्या योजनांचा समावेश आहे.

















































