मुख्य शाखेत ठेवीदारांची मोठी गर्दी! बँकेची एटीएम मशीन आणि सर्व चेक क्लिअरिंगही बंद असल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ..!
शिरपूर – शहरातील वादग्रस्त व अवैध कर्ज वितरणामुळे शिरपूर मर्चंट्स को-ऑप बँक लि. गंभीर आर्थिक संकटात सापडली आहे. बँकेच्या मुख्य शाखेत ठेवी काढण्यासाठी छोट्या-मोठ्या सर्वच ठेवीदारांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, अलीकडच्या काळात बाकीच्या ठेवीधारकांनी कोट्यवधी रुपयांच्या ठेवी काढून घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी बँकेच्या अवस्थेबाबत गेल्या महिन्यात पत्रकार परिषद घेतल्यानंतर या बँकेच्या ठेवीदारांनी ठेवी काढण्यासाठी रांगा लावल्याचा विपरीत परिणाम दिसून आला. सुरुवातीला, जोपर्यंत काही ठेवी आणि राखीव निधी बँकेकडे होता, त्या आधारावर बँकेच्या ठेवीधारकांना ठेवींचे वितरण केले जात होते. मात्र, आता नियमबाह्य़ आणि कोणतीही तारण हमी न देता कोट्यवधी रुपयांच्या कर्जांचे वाटप केल्याने जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामागील जबाबदार लाभार्थ्यांना कायदेशीर जाळ्यात आणण्याची गरज आहे.
तथापि, बँक व्यवस्थापन आणि व्यवस्थापक आणि डीडीआर यांनी सांगितले आहे की 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेव रकमेला विमा संरक्षण प्रदान आहेत. मात्र, आता, नियमबाह्य कर्ज वाटपाच्या लाभार्थ्यांच्या नवनवीन कथा रोज समोर येत असताना, बँकेच्या ठेवीधारकांमध्ये भीती पसरली आहे. या बँकेच्या मुख्य शाखेत तासनतास रांगेत उभे राहूनही लाखोंच्या ठेवीदारांना पाच हजार रुपये ही रोकड मिळत नसल्याचे अनेक ठेवीदारांनी ‘बँक बचाव समिती’च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून सांगितले. केवळ आश्वासने देऊन ठेवीदारांची बोळवणी केली जात आहे. याशिवाय अपात्र चेअरमन प्रसन्न जयराज जैन यांच्यानंतर अन्य 14 संचालकांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार अद्याप ही कायम आहे. ‘बँक बचाव समिती’च्या तक्रारीवरून सहाय्यक उपनिबंधक संजय गीते यांनी तपास सुरू केला आहे. जागरूक तक्रारदार सदस्यांनी सुरुवातीपासूनच सखोल चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात अनेक गंभीर तक्रारी लेखी आणि ई-मेलद्वारे उच्च स्तरावर म्हणजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सहकार मंत्री, राज्य सहकार आयुक्त पुणे आणि राज्य सह.निवडणूक निर्णय प्राधिकरण पुणे यांच्याकडेही पाठवण्यात आल्या आहेत. एका संचालकाच्या दिराला पन्नास लाखांचे कर्जही बेकायदेशीर पद्धतीने वाटप करण्यात आले असून, ही बाब तीन-चार वर्षांनंतर तेव्हा उघडकीस आली, जेव्हा या बँकेने वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून कर्ज वसुलीसाठी त्याचे नाव नुकतेच वर्तमानपत्रांत प्रसिद्ध केले. 2021 मध्ये एका संचालकाच्या रक्त नातेवाईकांना कोट्यावधी रुपयांचे कर्ज दिले आहे. याचेही पुरावे ‘बँक बचाव समिती’ कडे आहेत, अशी माहिती मिळाली आहे. परंतु व्यवस्थापक संजय कुलकर्णी यांनी कोणत्याही संशयास्पद व नियमबाह्य व अवैध कर्ज प्रकरणांबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करून या सर्व प्रकरणांवर माती टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. जणू मॅनेजर सकट सर्व गैरप्रकार करणारे दूधाने धुतलेले आहेत?आणि त्यांना हे सर्व नियमबाह्य क़र्ज़ वाटप करण्याचा विशेषाधिकारच प्राप्त आहे.
पण पापाला नाही मायबाप आणि पाप फुटे आपोआप, या न्यायानुसार आता सर्व काही उघड होईलच. उल्लेखनीय आहे कि, या बँकेच्या अंतरिम लेखापरीक्षकांनी आडिट रिपोर्ट मध्ये गेल्या अनेक वर्षांत नोंदवलेल्या गंभीर दोषांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणारे तत्कालीन चेअरमन, व्यवस्थापक, कर्ज अधिकारी आणि इतर संचालक यांच्यासह सर्व जबाबदार व्यक्तींना नियमबाह्य,असुरक्षित व बेकायदेशीर कर्जे वितरित केल्याबद्दल अपात्र घोषित करण्यात यावे व त्यांच्यावर यास्तव जबाबदारी निश्चित करून कार्रवाई करावी. परंतु एवढ्या दिवसांपासून चौकशी करून तात्काळ कारवाई न करता केवळ संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुका जाहीर करून स्वतःच्या कर्तव्याची इतिश्री समजणा-या डीडीआर यांच्या कार्यशैलीबाबत अनेक प्रश्न विचारले जाताहेत. मां.सहकार आयुक्त सो। पुणे यांचेकडे ‘बँक बचाव समिती’ने केलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यांच्या आदेशानुसार प्रभारी जिल्हा उपनिबंधक श्री मनोज चौधरी यांनी चाचणी लेखापरीक्षण करण्याची आर्डर शासकीय लेखापरीक्षक प्रथम श्रेणी श्री धीरज चौधरी यांना देऊन सखोल चौकशी अहवाल लवकरच सादर करण्यास सांगितले आहे.
विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, जिल्हा पोलिस अधीक्षक, धुळे आणि शिरपूर शहर पोलिस ठाण्यात या बँकेचे अपात्र चेअरमन, व्यवस्थापक, काही संचालक आणि लाभार्थी यांच्यावर बँकेच्या भागधारकांची आर्थिक फसवणूक आणि विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केलेली जागृत सदस्यांनी एक महिन्यांपूर्वीच लेखी स्वरुपात केलेली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांना पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी तपास करून गुन्हा नोंदविण्याच्या सूचना दिल्याची माहिती मिळाली आहे. शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी तपासाचे काम उपनिरीक्षक संदीप मुरकुटे यांच्याकडे सोपविले आहे. सखोल तपास सुरू असल्याचे व लवकरच तपास पूर्ण करण्याचे तपास अधिकारी संदीप मुरकुटे यांनी तक्रारदारांना आश्वासन दिले आहे. या बँकेच्या जागरुक सभासद आणि ठेवीदारांकडून लवकरच ‘बँक बचाव समिती’च्या माध्यमातून तीव्र आंदोलन सुरू करण्याबाबतही सल्लामसलत सुरू आहे.
मर्चंट्स बँकेच्या मुख्य शाखेत ठेवीदारांची प्रचंड प्रमाणात गर्दी होत असल्याने गोंधळ निर्माण होण्याच्या भीतीने बँक शाखेचे शटर नियोजित वेळेपूर्वीच बंद केले जात असल्याच्या तक्रारीही शेकडो ठेवीदारांकडून बँक बचाव समितीकडे केल्या जात आहेत.दिवसेंदिवस नवनवीन प्रकरणे उघडकीस येत असल्याने सध्या या बँकेविषयी संपूर्ण तालुकाभर चर्चा होत आहे.आता जागरूक आणि पीडित वृध्द,महिला आणि पेंशनर तसेच सर्वसामान्य ठेवीदार सभासद हे सर्वसामान्यांच्या ठेवींकरिता रिझर्व्ह बँक आणि बँकिंग लोकपाल यांच्याकडे दाद मागण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.या सर्व गैरप्रकारांच्या चौकशीमुळे बँक बचाव समितीच्या लढ्याला बळ प्राप्त झाले आहे.या बँकेबाबत पुढे काय काय नवीन माहिती समोर येते ते हे पाहणे महत्त्वाचे आहे. ते सर्व आपल्या समोर वेळोवेळी सादर करुच.