‘गोकुळ’ दूध संघाचा पारदर्शक कारभार दूध उत्पादकांसाठी लाभदायी – हसन मुश्रीफ
‘गोकुळ’च्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपणे आमची प्राथमिकता – आमदार सतेज पाटील
दूध उत्पादकांना गोकुळकडून दिवाळीची गोड भेट! म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयेची वाढ तसेच महालक्ष्मी पशुखाद्य दरामध्ये ५० रुपयाची कपात
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) संघाच्या वतीने पारंपरिक वसुबारस पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमात राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के. पी. पाटील, आमदार जयंत आसगावकर, केडीसीसी बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक मंडळ, संघाचे अधिकारी व शेकडो महिला दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभावर पारंपरिक विधीने गायीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ‘गोकुळ चीज’ आणि ‘गोकुळ गुलाबजामून’ या नव्या पदार्थांचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ‘गोकुळ आईस्क्रीम’ लवकरच बाजारात येणार असल्याचे संचालक मंडळाने जाहीर केले. दूध उत्पादकांसाठी गोकुळ संघाने महत्त्वाचे निर्णय घेतले. जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील गाय व म्हैशीच्या दुधाच्या खरेदी दरामध्ये प्रतिलिटर १ रुपयाची वाढ करण्यात आली. यामध्ये म्हैस दूध ५१.५० वरून ५२.५० रुपये व गाय दूध ३३ वरून ३४ रुपये करण्यात आले आहे. तसेच ‘महालक्ष्मी गोल्ड’ आणि ‘कोहिनूर डायमंड’ या पशुखाद्यांच्या मूळ विक्री दरात ५० किलो पोत्यावर ५० रुपये सवलत देण्यात आली आहे. मार्च २०२६ अखेरपर्यंत या योजनेतून दूध उत्पादकांना ५.५ कोटींचा लाभ मिळणार आहे. संस्था व्यवस्थापन खर्च ९० पैशांऐवजी १ रुपये (१० पैशांची वाढ) करण्यात आला आहे, ज्याचा ६ कोटींचा वार्षिक भार संघावर पडणार आहे. याचबरोबर गाभण जनावरांसाठी नवीन ‘महालक्ष्मी प्रेग्नन्सी रेशन’ बाजारात आणण्यात आले आहे. यामुळे प्रसूती सुलभ होते, रेडके/वासरे निरोगी जन्माला येतात आणि दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाने पारदर्शक व काटकसरी कारभारामुळे दूध उत्पादकांना मोठा दिलासा देत म्हैस दूध खरेदी दरात तब्बल १४ रुपये तर गाय दूध खरेदी दरात ८ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. संचालक मंडळाचा पारदर्शक व काटकसरी कारभार कसा अधिक लाभदायक ठरू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
मुश्रीफ म्हणाले, “संघ सध्या डिबेंचरवर ७.८% व्याज देत असून जे शेअर्समध्ये रूपांतर झाले आहेत, त्यांना ११ % व्याज मिळत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे गैरसमज निर्माण करून उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न होऊ नयेत. या विषयावर संघाने पूर्ण पारदर्शकता ठेवली आहे.” डिबेंचर्स विषयावर पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “संघामार्फत सर्व दूध संस्थांना विश्वासात घेऊन, त्यांचे अभिप्राय जाणून घेण्यासाठी आणि या विषयाचा तज्ञ समितीकडून अभ्यास करून एक सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. यानंतर हा विषय कायमस्वरूपी बंद करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.”
मुश्रीफ यांनी पुढे आवाहन केले की, “आता आपले एकमेव उद्दिष्ट गोकुळचे संकलन २५ लाख लिटरपर्यंत नेणे हे असले पाहिजे. विशेषतः शेतमजूर व अल्पभूधारक उत्पादकांना अधिक प्रोत्साहन देऊन संकलन वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत. संघाचे बळ हे सामूहिक प्रयत्नांत आहे.” गोकुळ दूध संघाचे संकलन, उत्पादकांचा विश्वास आणि पारदर्शक कारभार यांच्या जोरावर अधिक सक्षम बनविण्याचे आवाहन मुश्रीफ साहेबांनी या वेळी केले.
माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी नमूद केले की, “गोकुळने गेल्या साडेचार वर्षांत पारदर्शक कारभार ठेवत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. दूध दरवाढ, पशुखाद्य अनुदान, संस्थेचा मार्जिन वाढविणे हे सर्व निर्णय शेतकऱ्यांसाठी केले गेले आहेत. डिबेंचर्ससह सर्व विषयांचे समन्वय साधून कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल.” यावेळी स्वागत कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले व प्रस्ताविक माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी केले. आमदार चंद्रदीप नरके, माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी मार्गदर्शन केले. तर आभार संचालक अभिजित तायशेटे यांनी मानले. गोकुळ दूध संघाच्या या निर्णयांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आणि भावनिक पाठबळ मिळणार असून, वसुबारस आणि दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या गेल्या.
याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम.हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील,आमदार चंद्रदीप नरके, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार के.पी.पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.