“गोकुळ संघ आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणारा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारा– डॉ. मिनेश शहा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

एन.डी.डी.बी. आणि गोकुळ यांच्यात भविष्यकालीन सहकार्य अधिक दृढ होणार

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (गोकुळ) चे चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळाने ३० जुलै २०२५ रोजी गुजरातमधील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एन.डी.डी.बी.), आणंद व ‘अमूल’ संघाच्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास करण्यासाठी विशेष दौरा केला.

यावेळी एन.डी.डी.बी.चे चेअरमन डॉ. मिनेश शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना डॉ. शहा यांनी ‘गोकुळ’ संघाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी घेतलेली व्यावसायिक व तांत्रिक दिशा अत्यंत स्तुत्य असल्याचे मत व्यक्त केले.

गोकुळ संघ आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणारा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारा आणि शाश्वत शेतकरीहिताचा पुरस्कार करणारा एक आदर्श सहकारी संघ आहे. वासरू संगोपन, आयव्हीएफ (IVF) प्रकल्प आणि टीएमआर (चाराप्रक्रिया) क्षेत्रातील त्यांची कामगिरी इतर संघांसाठी प्रेरणादायी ठरते,” असे डॉ. शहा यांनी स्पष्ट केले. “एन.डी.डी.बी.कडून गोकुळला आजवर सहकार्य मिळाले आहेच, पण भविष्यात हे सहकार्य आणखी व्यापक आणि प्रभावी स्वरूपात दिले जाईल. दोन्ही संस्थांमध्ये संयुक्त प्रकल्प राबवून दुग्ध व्यवसायात नवे आयाम निर्माण करता येतील.”

यावेळी झालेल्या बैठकीत गोकुळच्या चालू उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने दूध उत्पादन क्षमतेत वाढ, पायाभूत सुविधांचा विकास आणि धोरणात्मक नवकल्पनांची अंमलबजावणी यावर सखोल चर्चा झाली.

गोकुळ चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, “एन.डी.डी.बी. व ‘अमूल’ संघाच्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास हा गोकुळसाठी निश्चितच दिशादर्शक आहे. आम्ही पाहिलेल्या योजनांचा लाभ घेऊन गोकुळ संघाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा आमचा दृढ निर्धार आहे.”

  • या अभ्यासदौऱ्याअंतर्गत, गोकुळ संचालक मंडळाने एन.डी.डी.बी. मुख्यालय, जैविक खत प्रकल्प, सौर ऊर्जा सिंचन प्रकल्प, वासरू संगोपन केंद्र, जनोमिक्स प्रयोगशाळा, कृत्रिम गर्भधारणा केंद्र (IVF), चारा विकास केंद्र (TMR), आयडीएमसी (IDMC) आणि खेडा जिल्हा दूध संघाच्या बेडवा येथील प्राथमिक संस्थेला भेट देऊन प्रत्यक्ष अनुभव घेतला.


एन.डी.डी.बी. चे चेअरमन डॉ. मिनेश शहा, गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, अमूल फेडरेशनचे कार्यकारी संचालक डॉ. अमित व्यास, एन.डी.डी.बी.चे डॉ. श्रीधर, डॉ. श्रीनिवास, डॉ. राजेश, डॉ. शेटकर, मनोज मुदडा, नितीन ठाकरे यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.


गोकुळ चेअरमन नविद मुश्रीफ यांचे स्वागत करताना एन.डी.डी.बी. चे चेअरमन डॉ. मिनेश शहा, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, अमूलचे डॉ. अमित व्यास, डॉ. योगेश गोडबोले आदी मान्यवर.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.