दूध उत्पादन वाढीस प्रोत्साहन देणे व उत्पादकांचा सन्मान करणे उद्देश ठेऊन ‘गोकुळ श्री’
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. (गोकुळ) यांच्या वतीने यावर्षीही ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, गोकुळ संलग्न सर्व दूध उत्पादकांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले आहे.
दूध उत्पादन वाढीस प्रोत्साहन देणे व उत्पादकांचा सन्मान करणे हा उद्देश ठेवून गोकुळ दूध संघ दरवर्षी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी व म्हैशींसाठी ही प्रतिष्ठेची स्पर्धा आयोजित करतो. यावर्षीची ‘गोकुळ श्री’ स्पर्धा दिनांक २० नोव्हेंबर २०२५ ते २९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत कोणत्याही दिवशी घेण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक दूध उत्पादकांनी आपल्या संस्थेच्या लेटरहेडवर चेअरमन/सचिव यांच्या सही आणि शिक्क्यानिशी अर्ज करून दि. ८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत संघाच्या बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी, गोगवे, शिरोळ व ताराबाई पार्क येथील कार्यालयात नोंदणी करावी. सहभागी होणाऱ्या म्हैशीने किमान १२ लिटर व गायीने किमान २० लिटर प्रतिदिन दूध देणे आवश्यक आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना म्हैस १ ते ३ क्रमांक व गाय १ ते ३ क्रमांक अशा सहा क्रमांकांना बक्षीस, शिल्ड व प्रमाणपत्र देऊन ‘गोकुळ श्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. बक्षीसाची रक्कम पुढीलप्रमाणे.
| अ.क्र. | बक्षीस क्रमांक | म्हैस बक्षीस रक्कम | गाय बक्षीस रक्कम | 
| १. | प्रथम क्रमांक | ३५,०००/- | २५,०००/- | 
| २. | द्वितीय क्रमांक | ३०,०००/- | २०,०००/- | 
| ३. | तृतीय क्रमांक | २५,०००/- | १५,०००/- | 
स्पर्धेबाबतच्या नियम व अटींची सविस्तर माहिती प्राथमिक दूध संस्थांना स्वतंत्र परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. या उपक्रमाद्वारे गोकुळ संघ दूध उत्पादकांना अधिक उत्पादनासाठी प्रेरित करीत असून, उत्पादकांचा सन्मान करण्याची परंपरा जपली जात आहे. जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादकांनी ‘गोकुळ श्री’ स्पर्धेत उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले आहे.













































