‘गोकुळ’ची दमदार प्रगती ठेवी ६०४ कोटीवर ; दूध संकलन २५ लाख लिटरचे उद्दिष्ट – नामदार हसन मुश्रीफ

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

दुग्धजन्य उत्पादनामुळे ‘गोकुळ’ची प्रगती अधिक वेगाने – आमदार सतेज पाटील

‘गोकुळचा’ ६३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: गोकुळ आईस्क्रीम शुभारंभ

कोल्‍हापूर (विनायक जितकर) – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने गोकुळच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्य गोकुळ आईस्क्रीमचा शुभारंभ, गोकुळ श्री स्पर्धा व विविध बक्षीस वितरण महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ व सर्व संचालक मंडळ, प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे संपन्न झाला.

यावेळी बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघ गेल्या पाच वर्षांत सातत्याने प्रगती पथावर असून संघाच्या ठेवी ३२० कोटी रुपयांवरून वाढून सध्या ६०४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत, तसेच दूध उत्पादकांना म्हैस दूध खरेदी दरामध्ये १४ रु.व गाय दूध खरेदी दरामध्ये १० रुपये अशी उच्चांकी दरवाढ दिली आहे. डिबेंचर्स संदर्भात नेमलेल्या समितीने लवकरच अभ्यास करून दूध उत्पादक व संस्थेच्या म्हणण्यानुसार निर्णय घ्यावा. सध्या संघाचे दूध संकलन सुमारे २० लाख लिटरपर्यंत पोहोचले असून येत्या काळात ते २५ लाख लिटरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

उन्हाळ्यामुळे पाणी व वैरणीची टंचाई निर्माण होऊन देशातील दूध उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. यासाठी गोकुळमार्फत वैरण बँकेच्या माध्यमातून दूध उत्पादकांनासाठी ओली वैरण उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हवामान बदल आणि पाणी टंचाई च्या पार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. जातिवंत म्हैस खरेदी योजनेअंतर्गत गेल्या पाच वर्षात सुमारे १२ हजार जातिवंत म्हैशी गोकुळच्या दूध उत्पादकांनी घेतली असून त्या जनावरांचे दूध संघाकडे पूर्णपणे येण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. जनावरांसाठी हवामानावर आधारित पॅरामेट्रिक विमा योजना गोकुळने सुरू केली असून तापमान ३२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास प्रतिजानावर दररोज ५०० रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे. गेल्या पाच वर्षांत संचालक मंडळाने पारदर्शक व काटकसरीचा कारभार करत गोकुळला प्रगतीपथावर नेले असून भविष्यात सर्वांच्या सहकार्याने गोकुळ देशातील अग्रगण्य दूध संघ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, गोकुळ हा केवळ दूध संकलनापुरता मर्यादित न राहता दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीद्वारे अधिक विस्तार करण्याचे धोरण संघाने स्वीकारले आहे. गोकुळची गुणवत्ता आणि विश्वास सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्यासह जुन्या सहकार नेत्यांनी दूरदृष्टी ठेवून गोकुळची भक्कम पायाभरणी केली. गोकुळमुळे सामान्य शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल, याची जाणीव त्यांना होती. आज सुमारे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम गोकुळमार्फत होत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांतील सहकाराची स्थिती पाहिली असता कोल्हापूर जिल्ह्यात सहकाराची मजबूत परंपरा असल्याचे दिसून येते. जिल्हा मध्यवर्ती बँक, गोकुळ दूध संघ आणि साखर कारखानदारी यांच्या माध्यमातून सहकाराचा पाया अधिक बळकट झाला आहे. सध्या साखर कारखानदारी काही अडचणींमधून जात असली तरी केडीसीसी बँकेच्या सहकार्यामुळे ही व्यवस्था चालू आहे.

गोकुळ हे नाव आज मोठ्या विश्वासाचे प्रतीक बनले असून गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना देश-विदेशात मागणी वाढत आहे. गेल्या पाच वर्षांत संचालक मंडळाने पारदर्शी व काटकसरीचा कारभार करत दूध संकलन व विक्रीमध्ये चांगली प्रगती साधली आहे. दूध उत्पादकांनी दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत प्रामाणिक व निस्वार्थीपणे काम करण्याची भूमिका आम्ही सर्वांनी घेतली आहे. पुढील पाच वर्षांसाठीही संघाने ठोस नियोजन तयार केले असून पुण्यासह इतर शहरांमध्ये गोकुळचा विस्तार करण्याचा मानस आहे. गुणवत्तापूर्ण उत्पादनांच्या माध्यमातून गोकुळचे नाव अधिक उंचावण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, स्व. आनंदराव पाटील चुयेकर यांनी १६ मार्च १९६३ रोजी सहकाराच्या माध्यमातून लावलेले छोटेसे रोप आज मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला मोठी चालना मिळाली असून हजारो दूध उत्पादकांच्या आर्थिक प्रगतीला गोकुळचा मोठा हातभार लागला आहे. संघाचा कारभार पारदर्शक पद्धतीने आणि दूध उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवून चालवला जात असल्यामुळे संघाची सातत्याने प्रगती होत आहे. गोकुळ ने उत्पादित केलेल्या १२ विविध फ्लेव्हर मधील ‘गोकुळ आईस्क्रीम’ चा अधिकृत विक्री शुभारंभ करण्यात आला असून निश्चितच हे ग्राहकांच्या पसंतीस उतरेल.

‘गोकुळश्री’ स्पर्धा व विविध बक्षीस वितरण करण्यात आले असून सुमारे १३ लाख रुपयांची बक्षिसे दूध उत्पादक, संस्था व वितरकांना देण्यात येत आहेत. महिला दूध उत्पादकांच्या सन्मानासाठी ‘नारी सन्मान योजना’ सुरू करण्यात आली असून त्याअंतर्गत महिलांना २ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाणार आहे. तसेच दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनीच्या सहकार्याने पॅरामेट्रिक विमा योजना सुरू करण्यात आली असून तापमान ३२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास प्रति जनावर प्रतिदिन ५०० रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. दुग्ध व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी गोकुळ दूध संघ AI आधारित आधुनिक गोठा प्रणाली सुरू करणार आहे. याशिवाय नेदरलँड्समधील तज्ज्ञांच्या माध्यमातून दूध उत्पादक व पशुवैद्यकांना प्रशिक्षण देण्याची योजना आहे.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली, मान्यवरांच्या हस्ते केक कापून ६३ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या वेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे स्‍वागत संघाचे ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील यांनी केले, तर प्रास्‍ताविक ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे तसेच यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आभार संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांनी मानले.

तसेच यावेळी सन २०२४-२५ या सालात जिल्ह्यास्तरीय तसेच तालुकास्तरीय गाय/म्हैस जास्तीत जास्त दूध पुरवठा संस्था, म्हैस जास्तीत जास्त दूध पुरवठा संस्था, म्हैस उत्तम प्रत दूध पुरवठा, गाय/ म्हैस जास्तीत जास्त दूध पुरवठा (महिला संस्था), तसेच कोल्‍हापूर, पुणे व मुंबई येथील जास्‍तीत-जास्‍त दूध विक्री करणा-या दूध दुग्धजन्य पदार्थ वितरकांचाही सत्‍कार व बक्षीस वाटप व माजी गोकुळच्या अधिकारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते व सर्व संचालकांच्या उपस्थित करण्यात आले.

याप्रसंगी या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के.पी.पाटील, माजी आमदार राजेश पाटील, गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, केडीसीसी बँकेचे संचालक भैय्या माने, संचालिका सौ.स्मिता गवळी, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, दूध उत्पादक, दूध संस्था प्रतिनिधी, वितरक, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.