विनायक जितकर
आमदार आबिटकर यांची तारांकित प्रश्नाव्दारे विधानसभेत लक्षवेधी…
मुंबई – सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सरकार गतिमानतेने काम करीत आहे. यामुळेच ‘सर्वसामान्यांचे सरकार अशी या सरकारची ओळख झालेली आहे. यामुळेच राज्यसरकारकडून गिरणी कामगारांना देखील मोठी आशा असून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गिरणी कामगारांना मुंबई शहरातच घरे द्या अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेमध्ये तारांकित प्रश्नाव्दारे लक्षवेधी केली.
यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, राज्यसरकारकडून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले जात आहेत. रखडलेले पुनर्विकासाचे प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. घर हे सर्वांचे स्वप्न असते. मुंबईच्या विकासात गिरणी कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. यामुळे पात्र गिरणी कामगारांची यादी तात्काळ निश्चित करून सर्व गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काची घरे लवकरात मिळावी अशी मागणी केली. तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गिरणी कामगारांना मुंबई शहरामध्येच घरे आवश्यक असून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गिरणी कामगारांना मुंबई शहरामध्येच घरे देण्याची आग्रही मागणी केली.
यावेळी बोलताना गृहनिर्माण मंत्री अतुलजी सावे म्हणाले की, गिरणी कामगारांना हक्काची घरे लवकर मिळावीत यासाठी समिती नेमण्यात आली असून गिरणी कामगारांची पात्रता निश्चित करण्याच्या आणि घरे वाटप करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. यामुळे नक्की किती घरे द्यायची आहेत ते समजून त्यापद्धतीने घरांची उपलब्धता निर्माण करता येईल. तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गिरणी कामगारांना मुंबई शहरामध्ये घरे देण्यास योग्य ती कार्यवाही करू असे अश्वासित केले.