गुजरातमधील सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित
नाशिक – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या पावन उपस्थितीत गुजरात मधील वडोदरा येथे राष्ट्रीय सत्संग, संस्कार मेळावा आणि गणेश याग भक्तिभावाने संपन्न झाला. वडोदरा येथील श्री सौराष्ट्र जैन सभागृहात रविवारी (२० जुलै) राष्ट्र आणि समाजहितासाठी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी गुजरातमधील सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवामार्गाच्या देश- विदेश अभियान विभागाने या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते. गणेश यागामध्ये सुमारे दोनशे विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हा धार्मिक कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी पादुका पूजनाचा लाभ घेतला. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते गिरनार मार्गावर निघालेल्या रथयात्रेचे गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांनी वडोदरा येथे स्वागत केले.
गुजरातमध्ये आगामी काळात बहुविध उपक्रम…
गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांनी मार्गदर्शन करताना गुजरातमध्ये आगामी काळात परमपूज्य गुरुमाऊली श्री.आण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत भव्य राष्ट्रीय सत्संग आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी माता सरस्वती पूजन व श्री चक्रराज श्रीयंत्र पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती दिली. गुजरातमध्ये सुरू असलेल्या रथयात्रेचे आणि सेवामार्गाच्या अठरा विभागांचे महत्व त्यांनी स्पष्ट केले. सेवामार्गातर्फे यापुढे गुजराती भाषिकांसाठी श्री स्वामी समर्थ मासिकाचे आणि गुजराती मार्गदर्शिकेचे (कॅलेंडर) प्रकाशन केले जाईल अशी घोषणा त्यांनी केली. यावेळी सेवामार्गाचे ज्येष्ठ सेवेकरी हितेशभाई पटेल हेही उपस्थित होते.












































