गुरुमाऊलींच्या सान्निध्यात गाणगापूर दत्तपीठावर दीपोत्सव, पादुका पूजन आणि महासत्संग
२४ ते २६ ऑक्टोबर दरम्यान भक्तिमय वातावरणात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचा वार्षिक दिव्य सोहळा
नाशिक (प्रतिनिधी):
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या पावन सान्निध्यात श्री क्षेत्र गाणगापूर दत्तपीठावर २४ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत भव्य मासिक महासत्संग, दीपोत्सव आणि श्री घोरकष्टोद्धारक पादुका पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कालावधीत भीमा-अमरजा संगम नदी पूजन, दीपोत्सव, श्री दत्तात्रय वज्रकवच पठण, सत्यनारायण महापूजा आणि महासत्संग हितगुज असे अनेक आध्यात्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठाप्रमाणेच, गाणगापूर येथे सेवामार्गतर्फे उभारलेले दत्तपीठ हे श्रीमद् गुरुचरित्रातील ४८व्या अध्यायातील पर्वतेश्वरकथेच्या पवित्र स्थळी उभे आहे. या जागेवर सदैव दिव्य आणि चैतन्यमय स्पंदने अनुभवास येतात.
दीपोत्सव आणि नदीपूजन
२४ ऑक्टोबर रोजी भीमा-अमरजा संगमावर नदीपूजनानंतर सायंकाळी दत्तपीठावर हजारो दिव्यांच्या प्रकाशात दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. वेदमंत्रांच्या गजरात होणारा हा नेत्रदीपक सोहळा भक्तांसाठी “याची देही याची डोळा” अनुभव ठरेल.
मासिक महासत्संग आणि हितगुज
२५ ऑक्टोबर रोजी सकाळी भूपाळी आरतीनंतर श्री दत्तात्रय वज्रकवच पठण, सत्यनारायण महापूजा आणि सकाळी १०.३० वाजता गुरुमाऊलींचे अमृततुल्य हितगुज होईल. त्यानंतर सर्व भक्तांना महाप्रसाद वाटप केले जाईल.
श्री घोरकष्टोद्धारक पादुका पूजन
२४ ते २६ ऑक्टोबर या तीन दिवसांत श्रीघोरकष्टोद्धारक पादुका पूजन सोहळा होणार आहे. या सेवेत सहभागी होण्यासाठी भक्तांना नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
बारा लक्ष “श्री स्वामी समर्थ” जपसेवा
गुरुमाऊलींच्या आज्ञेनुसार सेवेकऱ्यांनी धर्म, समाज व राष्ट्रहितासाठी बारा लक्ष “श्री स्वामी समर्थ” जप लिहिण्याचे संकल्प पूर्ण करावेत, तसेच अब्जचंडी सेवाही पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
: गुरुप्रसाद दिवाळी फराळाचे वाटप
गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागतर्फे दरवर्षीप्रमाणे “आपुलकीची दिवाळी” अभियान राबवण्यात आले आहे.
या अंतर्गत अनाथाश्रम, वृद्धाश्रम, आदिवासी पाडे, अंध व अपंग विद्यालयांमध्ये दिवाळी फराळाचे वाटप करण्यात येत आहे.