“पैसा ये पैसा” भ्रष्टाचार ‘ विषय सक्तीचा करा!*

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

*’ भ्रष्टाचार ‘ विषय सक्तीचा करा!*

मकरंद भागवत,

पत्रकार, चिपळूण.

भ्रष्टाचार हा विषय आता आपल्याला अजिबात नवीन नाही. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचे राजकारणी आणि सर्व प्रकारच्या, सर्व विभागाच्या प्रशासन यंत्रणा ‘भ्रष्टाचार’ या प्रमुख स्तंभावर उभ्या आहेत. ज्या दिवशी हा खांब कोसळेल त्या दिवशी सगळे राजकारणी ‘गरिबांचे कैवारीपण ‘ सोडून घरी बसतील आणि अधिकारी, कर्मचारीही काम सोडून देतील. भ्रष्टाचार हा ‘जीव का प्राण’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

भ्रष्टाचार थांबला तर आपला देश, राज्य, समाज, राजकारण, प्रशासन सर्व काही ठप्प होऊन जाईल. सगळीकडे नुसता गोंधळ उडेल. आत्ता जे काही ‘सुरळीत’ चालू आहे ते या भ्रष्टाचारामुळेच! आणि भ्रष्टाचार हा अधिक दृढ व्हावा यासाठी ज्युनिअर केजीपासूनच ‘ भ्रष्टाचार ‘ हा विषय सक्तीचा करण्याची गरज आहे. भाषा, विज्ञान, भूगोल, इतिहास, खेळ असे विषय शिकणे फारसे महत्वाचे राहिलेले नाही, उलट ‘ भ्रष्टाचार ‘ हा एकच विषय सखोल पद्धतीने शिकवला गेला तर तो विद्यार्थी दहावीत जाईपर्यंत भ्रष्टाचाराचे स्किल नक्कीच आत्मसात करेल. त्या जोरावर तो त्यात पदवी मिळवेल, पीएचडी करेल आणि देशाचे ‘उज्ज्वल ‘ भविष्य ठरेल. काहीजण भ्रष्टाचाराचे क्लासेस चालवतील, काही स्पेशली यासाठी कॉलेजेस काढतील.
आत्ता अगदी लहानपणापासून भ्रष्टाचार शिकवला तर काही वर्षांत मूल जन्माला आल्यावर रडण्याऐवजी ‘पैसा ‘, पैसा ‘ म्हणून ओरडेल! किती आनंदाची आणि गौरवाची बाब ठरेल ही! कल्पनाच करू शकत नाही. या कल्पनेनेच अंगावर रोमांच आले.
अगदी एखादा वेडा असेल तोच भ्रष्टाचार या विषयापासून लांब असेल.. किंवा राहील. असे अपवाद समाजात असतातच. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आपल्याला स्वतःची आणि देशाची भरभराट करायची असेल तर लक्षात ठेवा भ्रष्टाचाराशिवाय पर्याय नाही.

कारण तसा पर्याय नसता तर 99% राजकारणी, मंत्री, सचिव, सहसचिव, आयुक्त, जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवरचे अधिकारी, कर्मचारी यांनी भ्रष्टाचार केला असता का.. तर नाही. आयएएस, आयपीएस, एमपीएससी अशा अनेक स्पर्धा परीक्षा पास होऊन हे अधिकारी म्हणून रुजू होतात.. आपल्यालाही त्यांचे कौतुक वाटते पण अपवाद सोडता हे अधिकारी इतके भ्रष्ट आणि शिष्ट होतात की ते स्वतःला जनतेचे सेवक न मानता संस्थानिकच मानतात. सरकार त्यांना चांगले पगार, गाड्याघोड्या, नोकरचाकर, इतर सुखसोई, मानसन्मान सर्व काही देते, पण तरीही आपल्या बुद्धीचा उपयोग समजहितासाठी, राज्य, देश हितासाठी न करता स्वतःसकट पुढच्या सात पिढ्यांच्या तुंबड्या भरण्यासाठी करतात. असं करताना त्यांना थोडीही शरम वाटत नाही.

हे भ्रष्टाचार करतात मग काय खालचे अधिकारी, कर्मचारी, शिपाई प्रत्येकजण आपापल्या ‘कौशल्या’नुसार वरकमाई करतो. खरं तर ती वरकमाई राहिली नसून मुख्य कमाई झाली आहे आणि सरकारी पगार हा दुय्यम ठरला आहे. (अनेकांना त्याचीही बिल्कुल गरज नाही, पण नियमानुसार वेतन घ्यावे लागते म्हणून ते घेतात ) मोठे अधिकारी खरोखरंच प्रामाणिक राहिले तर राजकारणी, मंत्री यांची काय टाप आहे पैसे खायची… पण मुळातच हे अधिकारीच इतके लाचार आणि कोटगे झाले आहेत, ते राजकारण्यांच्या इतके आहारी गेलेत की बोलायची सोय नाही. काहींची अवस्था तर घरगडी म्हणण्याइतपत आहे. महसूल, पोलीस, आरोग्य, फ़ॉरेस्ट, शिक्षण, नगरविकास अशी मलईदार खाती मिळवण्यासाठी राजकारणी आग्रही असतात तसेच ‘क्रीम पोस्ट’ साठी अधिकारी आपला लिलाव करत असतात. भ्रष्टाचार जो भक्कमपणे उभा आहे तो या दोन मजबूत पायावर.. एक राजकारणी आणि दुसरा बडे प्रशासकीय अधिकारी.
त्याशिवाय न्याययंत्रणाही भ्रष्टाचाराने पोखरलेली दिसते, पत्रकारितेतही तेच. त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टर्स, बिल्डर्स, व्यापारी, कारखानदार, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था अशी असंख्य क्षेत्र भ्रष्टाचार या विषयात अगदी पारंगत झालेली आहेत.

आतापर्यंत भ्रष्टाचाराची जाणीव होण्याचे वय किंवा इयत्ता काहीशी वरची होती, कदाचित दहावी इयत्तेत किंवा 14/15 व्या वर्षी भ्रष्टाचाराशी ओळख होत असेल ती आता खाली खाली आली पाहिजे. भविष्याचा विचार करून अगदी लहान वयात बालवाडीपासून ‘भ्रष्टाचार’ हा विषय सक्तीचा केला पाहिजे.

आत्तापर्यंतचे जे ‘टॉप’ भ्रष्टाचारी देशाच्या, राजकारणात, प्रशासनात आहेत त्यांनी याकामी आपलं बहुमूल्य योगदान दिले पाहिजे.. एकत्र बसून अभ्यासक्रम ठरवला पाहिजे. काही ठिकाणी अशा योग्यतेचे अधिकारी, राजकारणी नसतील तर एखादा निपुण शिपाईही चालू शकतो. निवृत्तीच्या शेवटच्या क्षणापर्यंतही लाचखोरी न सोडलेले या विषयाचे शिक्षक, प्राध्यापक म्हणून काम करू शकतील.

*ता. क.* भ्रष्टाचार ही कीड आहे असे बोंबलत फिरणाऱ्या आणि त्याला विरोध करणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातील ‘ नतद्रष्ट ‘ अपवाद्याकडे सरकारने अजिबात लक्ष देऊ नये. आपले ‘ भ्रष्टाचारी महासत्ता ‘ बनण्याचे उद्दिष्ट कसे साध्य होईल याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी भ्रष्ट मंत्री, अधिकारी यांना प्रोत्साहन द्यावे. सामान्य माणूस जगला काय अंन नाही जगला काय, तो उपाशी राहिला काय, तो नाडला गेला काय… काही फरक पडत नाही. कारण शासन हे धनदांडगे, दोन नंबरवाले यांच्यासाठी असते. त्यामुळे अगदी अपचन होईपर्यंत खा खा करणाऱ्या अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना, कर्मचाऱ्यांना अभय देणे हे शासनाचे आद्य कर्तव्य आहे. ते पार पाडले पाहिजे.

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
9850863262

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.