फिक्कीच्या पुरस्कार सोहळ्यात आर्टिफिशिअल इंटिलिजन्स आणि मशिन लर्निंगचा वापर
मुंबई – फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) या उद्योजकांच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय संस्थेतर्फे आयोजित ‘अर्बन चॅलेंज समिट अँड अर्बन इनोव्हेशन्स अवॉर्ड्स 2025’ या पुरस्कार सोहळ्यात गुरुवारी नवी दिल्ली येथे महावितरणचा सन्मान करण्यात आला. वीज मागणीच्या अचूक अंदाजासाठी आर्टिफिशिअल इंटिलिजन्सचा कल्पक वापर केल्याबद्दल हा सन्मान झाला असून महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महावितरणने ग्राहकांच्या सेवेसाठी अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला आहे. फिक्कीच्या पुरस्कार सोहळ्यात आर्टिफिशिअल इंटिलिजन्स आणि मशिन लर्निंगचा वापर करून विजेच्या मागणीचा अचूक अंदाज करण्यासाठी आणि व्यावसायिक विश्लेषण करण्यासाठी महावितरणने विकसित केलेल्या प्रकल्पाला सन्मानाने मान्यता देण्यात आली. महावितरणचे मुख्य अभियंता (वीज खरेदी) संदीप पाटील यांनी कंपनीतर्फे हा पुरस्कार स्वीकारला. विजेची मागणी सतत बदलत असताना विजेच्या मागणीबद्दल अचूक अंदाज करून त्यानुसार तांत्रिक व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी या विशेष प्रकल्पासाठी मार्गदर्शन केले.
महावितरणने विकसित केलेल्या यंत्रणेमध्ये हवामान, यापूर्वीचा वीजवापर, आर्थिक घडामोडी, औद्योगिक व्यवहार, सणवार, जीवनमानातील बदल आणि सरकारची धोरणे अशा विविध घटकांचा विचार करून विजेच्या मागणीबाबत अचूक अंदाज केला जातो. वीज उत्पादन केंद्रे कधी बंद आहेत, त्यांची देखभाल कधी होणार आहे, वीज खरेदी करारांची स्थिती आणि इंधन पुरवठा या बाबींचा विचार करून विजेच्या उपलब्धतेबाबतही अचूक अंदाज केला जातो. विजेच्या मागणी व पुरवठ्यातील तफावत निश्चित करून एक दिवस आधी किंवा तातडीने वीज खरेदीसाठी रणनीती ठरविण्यासाठी आर्टिफिशिअल इंटिलिजन्सवर आधारित व्यवस्थेचा उपयोग होतो. पॉवर एक्सचेंजमधून वीज खरेदीसाठी बोली लावतानाही या व्यवस्थेचा उपयोग होतो. या व्यवस्थेमुळे महावितरणला अनावश्यक खरेदी टाळण्यासाठी मदत होते तसेच ग्रीडचे स्थैर्य राखण्यातही मदत होते.