उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करावे – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

जागतिक मृदा दिनी ‘चला माती समजून घेऊया, शेती समृद्ध करूया’ अभियानाला सुरुवात

गारगोटी (विनायक जितकर) – रासायनिक खते आणि पाण्याचा अमर्याद वापर, बदलती पीक पद्धती तसेच सेंद्रिय खतांचा अभाव यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. ज्याप्रमाणे आपले आरोग्य बिघडल्यावर आपण सर्व प्रकारच्या तपासण्या करूनच औषध घेतो, त्याचप्रमाणे मातीचेही परीक्षण करूनच उत्पन्न वाढीचे नियोजन केले पाहिजे, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. जागतिक मृदा दिनानिमित्त जिल्ह्यातील तीनशे गावांमध्ये ‘चला माती समजून घेऊया, शेती समृद्ध करूया’ या अभियानाला भुदरगड तालुक्यातील पळशिवणे या गावातून सुरुवात झाली. यावेळी कार्यक्रमाला पळशिवणे गावातील शेतकऱ्यांसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, ‘गोपाल रत्न’ पुरस्कार विजेते अरविंद पाटील आणि कृषी विज्ञान केंद्र (कनेरी) येथील मृदाशास्त्र तज्ज्ञ राजेंद्र वावडे उपस्थित होते.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियाना’अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या ‘हेक्‍टरी १२५ टन शाश्वत ऊस उत्पादकता वाढ’ अभियानातील हा एक महत्त्वाचा घटक आहे. जिल्ह्यातील ३०० गावांमध्ये एकाच दिवशी हा कार्यक्रम पार पडला. येत्या मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील २६ हजार शेतकऱ्यांना ‘जमीन आरोग्य पत्रिके’चे (Soil Health Card) वितरण करण्यात येणार आहे.

अभियानाबाबत बोलताना पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे प्रमाणपत्र केवळ वितरित करून चालणार नाही, तर त्यांना त्या अहवालातील मुद्दे पटवून दिले पाहिजेत आणि त्याचे महत्त्व सांगितले पाहिजे. त्या-त्या शेतकऱ्याला आपल्या जमिनीचा पोत आणि कस माहिती व्हावा, तसेच उत्पन्न वाढीसाठी नेमक्या पद्धतीने काय करावे लागेल, हे त्या अहवालात नमूद असते; ते त्यांना समजावून सांगावे लागेल. यासाठी ज्याप्रमाणे शेतकरी आपल्या शेतात असतो, त्याप्रमाणेच कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन याबाबत मार्गदर्शन करावे. उत्पन्न वाढीसाठी माती परीक्षण आवश्यकच असून, कृषी विभागाच्या मार्गदर्शनातूनच उत्पन्न वाढ साधता येईल.

पळशिवणे येथील शेतकऱ्यांच्या शेतात यावेळी माती परीक्षणासाठी आवश्यक नमुने घेण्याची शास्त्रोक्त पद्धत तज्ज्ञांमार्फत शेतकरी व उपस्थितांना समजावून सांगण्यात आली. या कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, ‘गोपाल रत्न’ पुरस्कार विजेते अरविंद पाटील, कृषी विज्ञान केंद्र (कनेरी) येथील मृदाशास्त्र तज्ज्ञ राजेंद्र वावडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात यावेळी काही शेतकऱ्यांना ‘जमीन आरोग्य पत्रिके’चे वितरणही करण्यात आले. जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणी प्रयोगशाळेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘माती परीक्षण माहिती पत्रिके’चे अनावरण करण्यात आले. तसेच, शेतकऱ्यांनी ‘डिजिटल मदतनीस – महाविस्तार मोबाईल ॲप’ या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’वर आधारित माध्यमाचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग – महाराष्ट्र शासन आणि तालुका कृषी अधिकारी, भुदरगड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.