पारंपारिक पद्धतीने ग्रामस्थांकडून उस्फूर्तपणे जंगी स्वागत
राधानगरी (विनायक जितकर) – मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामविकासाला चालना देण्यासाठी प्रसिद्ध विनोदी अभिनेते भाऊ कदम यांनी ग्रामपंचायत मजरे कासारवाडा (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथे भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांच्या आगमनानिमित्त गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गावाच्या प्रवेशद्वारावर तसेच विविध ठिकाणी आकर्षक स्वागत फलक व गावातील विकास कामाचे देखावे उभारून भाऊ कदम यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी भाऊ कदम यांनी गावातील विकासकामे, स्वच्छता उपक्रम आणि लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती त्यांना देण्यात आली. यावेळी गावातील महिला यांच्याकडून आधुनिक व पारंपरिक देखावे उभारण्यात आले होते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामविकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
प्रसिद्ध विनोदी अभिनेते भाऊ कदम यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “गावाचा विकास हा केवळ शासनाच्या योजना राबवून होत नाही, तर त्यासाठी ग्रामस्थांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा असतो. मजरे कासारवाडा ग्रामपंचायतीने लोकसहभागातून राबविलेले उपक्रम पाहून समाधान वाटले. स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये गावाने केलेली प्रगती ही इतर गावांसाठीही प्रेरणादायी आहे.” ते पुढे म्हणाले, “गावाच्या विकासासाठी एकजूट आणि सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक आहे. शासनाच्या योजनांचा योग्य लाभ घेत गाव अधिक सुंदर, स्वच्छ आणि आदर्श बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत. मजरे कासारवाडा गावाने घेतलेली ही विकासाची वाटचाल निश्चितच कौतुकास्पद आहे.” गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मुगदूम यांनी केले. तर स्वागत प्रमोद तौंदकर, प्रस्ताविक ग्रामविकास अधिकारी सचिन बारड, आभार सरपंच योगिता वारके यांनी मानले. कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जि प कोल्हापूर जयवंत उगले, सहाय्यक गट विकास अधिकारी अविनाश मेश्राम, राधानगरी गटविकास अधिकारी संदीप भंडारे, भुदरगड गटविकास अधिकारी शेखर जाधव, सहाय्यक गट विकास अधिकारी अविनाश कामत, ग्रामपंचायत अधिकारी सचिन शिरदवाडे विस्तार अधिकारी पी डी जाधव, विस्तार अधिकारी लालासो मोहिते, छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पाटील, उपसरपंच विक्रम वारके युवराज वारके, सचिन वारके, सुनिल वारके, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन अध्यक्ष व सचिव, राधानगरी व भुदरगड तालुक्यातील सरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाऊ कदम यांच्या उपस्थितीमुळे गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. या भेटीमुळे ग्रामपंचायत मजरे कासारवाडा येथे सुरू असलेल्या विकासकामांना अधिक प्रेरणा मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

















































