गोकुळच्या संभाव्य निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळावा यासाठी आवश्यक असणारे सर्व प्रयत्न
राधानगरी प्रतिनिधी – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या सभासद असलेल्या ११०८ दूध संस्थांना मतदानापासून वंचित ठेवण्याबाबत न्यायालयात सुरू असलेला वाद हा त्या संस्थांवर आणि त्यांच्याशी निगडित हजारो दूध उत्पादकांवर अन्याय करणारा ठरू शकतो. त्यामुळे या सर्व संस्थांना गोकुळच्या संभाव्य निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळावा यासाठी आवश्यक असणारे सर्व प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजीत तायशेटे यांनी केले.
गोकुळ दूध संघाच्या संभाव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना तायशेटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, न्यायालयीन वाद सुरू असलेल्या सर्व ११०८ प्राथमिक दूध संस्था या गोकुळच्या सभासद आहेत आणि गेली अनेक वर्षे या संस्था नियमितपणे गोकुळला दूध पुरवठा करत आहेत. या संस्था कोणत्याही एका विशिष्ट राजकीय पक्षाशी संबंधित नसून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून त्या स्थापन झालेल्या आहेत.
त्यामुळे या संस्था म्हणजे हजारो दूध उत्पादकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्था आहेत. अशा संस्थांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवणे योग्य ठरणार नाही. म्हणूनच या संस्थांचा मतदानाचा हक्क अबाधित राहावा यासाठी गोकुळ दूध संघाचा संचालक म्हणून तांत्रिक, कायदेशीर आणि न्यायालयीन स्तरावर लागणारे सर्व प्रकारचे सहकार्य करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे तायशेटे यांनी सांगितले. तसेच दूध उत्पादकांच्या हक्कांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.



















































