
दुरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक व आयुक्त यांच्याशी संवाद
कोल्हापूर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचे सूक्ष्म नियोजन, प्रशासनाबरोबर पदाधिकाऱ्यांचाही सहभाग
कोल्हापूर, : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरहून विकसित भारत संकल्प यात्रेबाबत दुरदृष्य प्रणालीद्वारे राज्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त यांच्याबरोबर आढावा बैठक घेतली. विकसित भारत संकल्प यात्रा प्रभावीपणे राबवून केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी 14 योजना तळागाळातल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा व त्याचा लाभ त्यांना त्याच ठिकाणी द्या अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. समाजातील प्रत्येक घटकाला सामाजिक प्रक्रियेत आणण्यासाठी ही विकसित भारत संकल्प यात्रा महत्त्वाची असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून या यात्रेचे नियोजन प्रत्येक गावागावात केले जात आहे.
याबाबत जिल्ह्यातील अधिकारी पदाधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी एकत्रित येऊन ही यात्रा यशस्वी करा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या. दुरदृष्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव उपस्थित होते. तर कोल्हापूर येथून या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, यात्रेचे ग्रामीण नोडल अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
विकसित भारत संकल्प यात्रा ही सर्वसामान्य घटकांपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्याचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम केंद्रासह राज्य शासनाचा देखील आहे. यात्रेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून द्या. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा असे मुख्यमंत्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. विकसित भारत संकल्प यात्रा ही मोहीम संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबवून राज्य देशात आघाडीवर असले पाहिजे, यासाठी सर्व जिल्ह्यांनी प्रयत्न केला पाहिजे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित भारत संकल्प यात्रेत शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची संपृक्तता (सॅच्युरेशन) करून शेवटच्या प्रत्येक माणसापर्यंत योजना पोहोचवा अशा सूचना केल्या. हा कार्यक्रम आपला समजून राबवण्यासाठी त्यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले. यात्रा यशस्वी झाली तर गरजूंना योजना मिळतील आणि विकसित भारताचे स्वप्न साकारेल असे ते यावेळी म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा कार्यक्रम केंद्र शासनाचा महत्त्वकांक्षी कार्यक्रम असून यामध्ये स्थानिक स्तरावरील तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्यासह महत्त्वाच्या सर्व अधिकाऱ्यांचा समावेश असावा, स्थानिक पदाधिकारी, नागरिकांचाही समावेश असावा याबाबत सूचना केल्या. हा कार्यक्रम सर्वसामान्य जनतेचा आहे फक्त शासनाचा नाही त्यामुळे सर्व प्रकारच्या घटकांचा समावेश करून मोठ्या गर्दीत हे कार्यक्रम होतील यासाठी प्रशासनाने प्रत्यक्ष नियोजन करावे असे ते पुढे म्हणाले.

|