श्री स्वामी सेवामार्गातर्फे गंगा दशहरा उत्सव अपूर्व उत्साहात साजरा..!
परमपूज्य गुरुमाऊली यांच्यासह साधू ,महंत, लोकप्रतिनिधींची उपस्थिती..
नाशिक (प्रतिनिधी) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे नाशिकच्या रामकुंडावर गंगा दशहरा उत्सव अपूर्व उत्साहात साजरा झाला. परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे व गुरुमाता सौ. मंदाकिनीताई मोरे यांच्या हस्ते गंगापूजन झाले तेव्हा उपस्थित हजारो सेवेकर्यांनी गंगा गोदावरीचा जयजयकार करून देशात सुवृष्टी होण्यासाठी गंगा मातेला प्रार्थना केली.
गेल्या ५१ वर्षापासून श्री स्वामी सेवा मार्गातर्फे देशात मुबलक पाऊस होण्यासाठी दरवर्षी गंगा दशहरा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी शनिवारी (३१ मे) रामकुंडावर गंगापूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या समवेत खासदार राजाभाऊ वाजे,दाते पंचांगकर्ते मोहनशास्त्री दाते, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज मुकुंदराज होळकर, तसेच दिगंबर आणि वैष्णव आखाड्याचे साधू महंत यांची विशेष उपस्थिती होती. प्रारंभी मंत्रघोषात गुरुमाऊली उभयतांनी गंगा पूजन केले. त्यानंतर त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले. भजन आणि गंगेची आरती होऊन परमपूज्य गुरुमाऊलींनी सेवेकऱ्यांना संबोधित केले.
देश सुजलाम सुफलाम व्हावा ही प्रार्थना
परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी आपल्या प्रासादिक अमृततुल्य हितगुजात सांगितले की,देशात सुवृष्टी होऊन मुबलक अन्नधान्य पिकावे आणि देश सुजलाम सुफलाम व्हावा याकरिता सेवामार्गातर्फे गंगा दशहरा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. या उत्सवात सहभागी झालेले सारे सेवेकरी भाग्यवान आहेत.
सेवा मार्गाचे सारे अठरा विभाग जनकल्याणासाठी आहेत. त्यामध्ये अवश्य सहभागी व्हा असे त्यांनी नमूद केले. रामकुंडावर श्री गंगा मातेच्या मंदिरापाशी हा अपूर्व सोहळा पार पडला. यावेळी हजारोंच्या संख्येने स्त्री-पुरुष सेवेकरी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी उदयनगर ते रामकुंडापर्यंत सेवेकर्यांनी हातात भगवे ध्वज, डोक्यावर मंगल कलश, मुखात स्वामी नाम घेत सवाद्य दिंडी काढली. कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये उदयनगर सेवाकेंद्राने महत्त्वपूर्ण योगदान दिले. कार्यक्रम अतिशय नियोजनपूर्वक पार पडला.












































