विद्यार्थीनींशी संवाद, तक्रार पेटी, डायल 112 वर तत्काळ कृतीचा दिला संदेश
कोल्हापूर (प्रतिनिधी) – शहरातील महाविद्यालय परिसरात मुलींच्या छेडछाडीचे प्रकार, अल्पवयीन वाहनचालक तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) सौ. प्रिया पाटील यांनी आज एक विशेष जनजागृती व नियंत्रण मोहीम राबविली. त्यांनी विवेकानंद कॉलेज, शहाजी कॉलेज, न्यू कॉलेज, गोखले कॉलेज, महावीर कॉलेज आदी परिसरात प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थीनींशी संवाद साधला.
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पाटील यांनी सांगितले की—
“कोणताही छेडछाडीचा प्रकार घडल्यास मुलींनी अजिबात न घाबरता तात्काळ डायल 112 वर कॉल करावा. पोलिस तत्काळ मदतीस येतील.” त्यांनी पुढे प्रत्येक महाविद्यालयात बसवलेल्या तक्रार पेट्यांची माहिती दिली. विद्यार्थीनींनी आपल्या तक्रारी थेट पेटीत टाकाव्यात, त्याचे निवारण निर्भया पथकाद्वारे केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच कॉलेज परिसरात हुल्लडबाजी, तिब्बल सिट फिरणे, मुलींना विनयभंगासारखे वर्तन करणे यावर पोलिस कठोर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
डी.वाय.एस.पी. प्रिया पाटील यांनी पालकांनाही केलेले आवाहन लक्षवेधी ठरले—
“अल्पवयीन मुलांना वाहन चालवू देऊ नका; अपघाताचा धोका वाढतो. मुलांच्या सुरक्षिततेत पालकांनी जागरूक भूमिका निभावणे आवश्यक आहे.” या मोहिमेत शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, जुनाराजवाडा, राजारामपूरी आणि शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.
स्वतंत्र : वाहतूक शाखेची संयुक्त कारवाई – ३६९ जणांवर एकूण ४.१७ लाख दंड
शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शहर वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिस ठाण्यांकडून संयुक्त कारवाई करण्यात आली.
एकूण ३६९ वाहनधारकांवर कारवाई करत ४,१७,७५० रुपये दंड वसूल करण्यात आला.
उल्लंघन व दंड
लायसन्स न काढणे – 31 (₹1,55,000)
विना-लायसन्स वाहन चालविणे – 36 (₹36,000)
तिब्बल सिट – 33 (₹41,000)
मोबाईलवर बोलणे – 32 (₹18,000)
कर्कश हॉर्न – 7 (₹150)
फॅन्सी नंबर प्लेट – 32 (₹27,000)
L बोर्ड न लावणे – 5 (₹5,500)
इतर (नो पार्किंग / आदेश न पाळणे / कागदपत्र जवळ नसणे) – 225 (₹1,34,100)
एकूण दंड : ₹4,17,750
कारवाई पो.नि. नंदकुमार मोरे (वाहतूक), पोनि संतोष डोके (शाहूपुरी), पोनि किरण लोंढे (जुनाराजवाडा), पोनि श्रीराम कन्हेरकर (लक्ष्मीपुरी) आणि पोनि होडगर (राजारामपूरी) यांच्या निरीक्षणाखाली करण्यात आली.

















































