राधानगरी तालुक्यातील केळोशी पैकी माळवाडी येथील घटना… नातेवाईकांकडून पती, सासू, सासरे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी…
राधानगरी – राधानगरी तालुक्यातील केळोशी पैकी माळवाडी इथली नवविवाहिता सविता दत्तात्रय शिंदे वय २४ वर्षे हिने सासरच्या जाचाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली, तीन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या मुलीला जाचाला कंटाळून आत्महत्या करावी लागल्याने आत्महतेस प्रवृत्त करणारे पती, सासू, सासरे यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि निष्पाप मुलीला न्याय द्यावा अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी राधानगरी पोलीस ठाण्यात ठाण मांडत केली.
सविता शिंदे हिला पती, सासूसासऱ्याकडून सततचा जाच होत होता. तिला दीड वर्षांची लहान मुलगी आहे. जाचाला कंटाळून ती चार महिन्यांपूर्वी चक्रेश्वरवाडी गावी माहेरी आली होती. स्थानिक पंच आणि नातेवाईकांनी वाद मिटवत मुलीला सासरी पाठवलं होतं. तरीही जाच सुरूच ठेवल्याने नवविवाहितेनं जाचाला कंटाळून अखेर मंगळवारी सकाळी विषारी औषध प्राशन केलं. तिला उपचारासाठी कोल्हापूर इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं.
उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं. पण मंगळवारी रात्री तिची प्राणज्योत मालवली. बुधवारी पहाटे तिच्या सासरी केळोशी पैकी माळवाडी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. संतप्त नातेवाईकांनी राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मुलीची कैफियत मांडत मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करणारे पती, सासूसासऱ्यावर गुन्हा नोंद करून न्याय देण्याची मागणी केली आहे.















































