गांधीनगर : दोन तासांत खून प्रकरणातील चौघे आरोपी व तीन बालक पोलिसांच्या जाळ्यात!
कोल्हापूर, : कोल्हापूर शहरातील गांधीनगर परिसरात एका युवकाचा निर्घृण खून करून मृतदेह पंचगंगा नदीकाठावर फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या दोन तासांत या खून प्रकरणातील चौघे आरोपी आणि तीन विधी संघर्षग्रस्त बालक अशा एकूण सात जणांना ताब्यात घेतले आहे.
गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयना कॉलनी येथे आशुतोष सुनिल आवळे या युवकाचा मृतदेह शनिवारी रात्री आढळून आला होता. प्राथमिक तपासात हा मृत्यू संशयास्पद असल्याचे लक्षात आल्यानंतर गांधीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात डोक्यात गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाल्याने आशुतोषच्या वडिलांनी खुनाची तक्रार दिली. त्यामुळे गांधीनगर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांच्या पथकाने तातडीने तपास सुरु केला.
तपासादरम्यान पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, परंतु कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. अशातच पोलीस अमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काही संशयित तरुण खून करून फरार होण्याच्या तयारीत आहेत.
पोलिसांनी तत्काळ गांधीनगर परिसरात कारवाई करत करण महेश डांगे या संशयिताला ताब्यात घेतले. कडक चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन केलेल्या सखोल चौकशीत त्याने खूनाची कबुली दिली. त्याने सांगितले की, कोयना कॉलनीत गेम खेळताना झालेल्या वादातून आशुतोष आवळे याने त्याच्या आई-बहिणीवर अपशब्द वापरल्याने रागाच्या भरात शंकर बनसोडे, राजू काळोखे, शुभम कांबळे आणि तीन बालकांनी मिळून दगड व लाकडी बॅटने त्याच्यावर वार केले आणि त्याचा जागीच खून केला. नंतर मृतदेह पंचगंगा नदीकाठी फेकून दिला.
करण डांगेच्या कबुलीवरून इतर आरोपींना शोधण्यासाठी पथकांनी परिसरात सापळा रचला. शंकर बनसोडे आणि राजू काळोखे हे दोघे कराडला पळून जाण्याच्या तयारीत असताना तावडे हॉटेलजवळ अटक करण्यात आले. उर्वरित आरोपी व बालकांना गांधीनगर, कावळा नाका आणि एसटी स्थानक परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.
या कारवाईत शंकर बापू बनसोडे (१९), राजू सचिन काळोखे (२०), शुभम संजय कांबळे (१९), करण महेश डांगे (१८) व तीन बालकांना पोलिसांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.
या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पीएसआय संतोष गळवे आणि पथकातील पोलीस अमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, योगेश गोसावी, प्रदीप पाटील, राजू कांबळे, शिवानंद मठपती, विशाल खराडे, संतोष बरगे, अमित मर्दाने आणि अरविंद पाटील यांनी अथक मेहनत घेतली.गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून आरोपींविरुद्ध खून आणि इतर संबंधित कलमान्वये कठोर कारवाई होणार आहे.