शाहूपुरीत विवाहाचे आमिष दाखवून तरुणीस आठ वर्षांपासून शारिरीक अत्याचार; आरोपीवर गुन्हा दाखल
कोल्हापूर : शाहूपुरी पोलिसांनी एका ३७ वर्षीय व्यक्तीविरोधात तब्बल आठ वर्षांपासून विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर वेळोवेळी शारिरीक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीचे नाव योगेश प्रफुल्ल जाधव (वय ३७, रा. भादोले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांची ओळख गेल्या आठ वर्षांपासून होती. आरोपीने आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन लग्न करण्याचे आमिष दाखवले होते. त्या बहाण्याने फिर्यादीसोबत घरी व रिसॉर्टवर वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवले.
दरम्यान, फिर्यादी सध्या तीन महिन्यांची गर्भवती असून, ही माहिती आरोपीला दिल्यानंतर त्याने शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच ‘केस केलीस तर मला फारतर तीन महिने आत ठेवतील, त्यानंतर बाहेर आल्यावर तुझं काही खरं नाही’ असे म्हणत धमकावले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास क्रांती पाटील, सहायक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.