सरन्यायाधीशांच्या भेटीला विविध क्षेत्रातील मान्यवर
कोल्हापूर: कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे कोल्हापूर येथे आगमन झाले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. विधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, प्रशासन, वकील संघटनांचे प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांची भेट घेतली.
सर्किट बेंचसाठी 9 हेक्टर 18 आर जागा शेंडा पार्क येथे प्रस्तावित करण्यात आली आहे. या जागेसाठी शासनाची मान्यता मिळण्याबाबतची कार्यवाही सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना दिली.
दरम्यान सुमारे दीडशे वर्षांपूर्वी 1874 मध्ये बांधलेल्या आणि कौटुंबिक न्यायालयासाठी वापरात असलेल्या इमारतीची माहिती सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली. या इमारतीचे नूतनीकरण करुन याठिकाणी डिव्हिजन बेंचचे काम सुरु होणार आहे. तसेच राधाबाई इमारतीमध्ये ग्रंथालय, नोंदणी विभाग व व्हिडीओ कॉन्फरन्स रुमचे कामकाज होणार असून याचीही माहिती त्यांनी पुणे विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्याकडून घेतली. सर्किट हाऊसच्या हेरिटेज वास्तूविषयीही त्यांनी जाणून घेतले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.