![]() |
गारगोटी (कोल्हापूर) ─ ग्रामीण भागाच्या आर्थिक उन्नतीसाठी व सहकार तत्त्वांची रुजवण अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी च्या वतीने “चला सहकाराचा संवाद साधूया” या उपक्रमांतर्गत २३ ऑगस्ट रोजी गारगोटी येथे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात भुदरगड व राधानगरी तालुक्यातील १०० हून अधिक पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहून अर्थशिस्त, व्यवस्थापन व सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण चर्चा केली.दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडचणी त्यावरील उपाय योजना सहकार क्षेत्र भक्कम कसे करू शकतो. या गोष्टींचा समावेश प्रशिक्षणामध्ये होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर होते. त्यांनी सहकार हा खेड्यापाड्यातील आर्थिक शाश्वततेचा आधार असून, तो केवळ व्यवहारापुरता मर्यादित न राहता ग्रामीण विकासाचे प्रभावी साधन आहे, असे प्रतिपादन केले. जिल्हा उपनिबंधक एम. ए. मुरूडकर यांनी शासकीय दृष्टीकोन मांडला. विभागीय समन्वयक अरुण काकडे यांनी पतसंस्थांनी पारदर्शकता आणि जबाबदारी जपल्यास त्यांची विश्वासार्हता अधिक दृढ होते, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांनी केले. त्यांनी संस्थेचा आजवरचा प्रवास, सातत्याने वाढता विस्तार आणि ग्रामीण भागातील सहकारी कामगिरीचा आढावा घेतला.
या कार्यक्रमाला क्षेत्रीय व्यवस्थापक (लेखी परीक्षण) मनोहर देशमुख, सातारा विभागीय व्यवस्थापक गुरुनाथ लोखंडे, सांगली विभागीय व्यवस्थापिका शिल्पा कुलकर्णी यांच्यासह पुणे, सातारा, कोल्हापूर व सांगली विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रतिनिधींनी या शिबिराचा मोठा लाभ झाला, प्रत्यक्ष कामकाजात सुधारणा करता येईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी एकमताने संदेश उमटला की – सहकारातूनच ग्रामीण समाजाचा सर्वांगीण विकास साध्य होऊ शकतो. |
![]() ![]() |