जगण्यासाठी लागणारे भान चिल्लर पार्टीच्या चळवळीमुळे – नंदकुमार मोरे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

सातव्या बाल चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन, द मॅजिक एलिफंटने उघडला पडदा, पहिल्या दिवशीच्या तीन चित्रपटांना १५०० बाल प्रेक्षकांची हजेरी…

कोल्हापूर – अन्न, वस्त्र आणि निवारा इतकेच नव्हे तर जगण्यासाठीचे लागणारे भान चिल्लर पार्टीच्या चित्रपट चळवळीतून मिळते असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभाग प्रमुख प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांनी बुधवारी केले. चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत शाहू स्मारक भवनात बुधवारी सातव्या बालचित्रपट महोत्सवास प्रारंभ झाला. यावेळी उद्घाटन समारंभात डॉ. मोरे बोलत होते. मुखवटे घातलेल्या बाल प्रेक्षकांच्या प्रतिनिधींचा सेल्फी काढून प्रमुख पाहुण्यांनी रंगमंचावरून अनोख्या पद्धतीने या महोत्सवाचे उद्घाटन केले.

डॉ. मोरे म्हणाले, माणसांमध्ये माणुसकी, संवेदनशीलता, एकमेकांबद्दलचे प्रेम, सहानुभूती आणि सद्भाना यावी, माणूस हा माणूस म्हणूनच रहावा, त्याचे जनावर होऊ नये यासाठी चिल्लर पार्टी चित्रपटांच्या माध्यमातून काम करत आहे. मानवी संवेदना जागृत ठेवण्याचे काम चिल्लर पार्टी दाखवत असलेल्या चित्रपटांमधून निर्माण होत आहे.

महोत्सवाचे समन्वयक सुधाकर सावंत यांनी प्रास्तविक भाषणात चिल्लर पार्टीच्या ११ वर्षाचा आढावा घेतला. मिलिंद नाईक यांनी महोत्सवात सहभागी झालेल्या शाळांच्या ग्रंथालयासाठी पुस्तक भेट देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांचे स्वागत केले. यावेळी उदय नारकर यांचाही रोप देऊन सत्कार करण्यात आला.

मिलिंद यादव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पेठ वडगाव येथील निसर्गप्रेमी मित्र या संस्थेचे डॉ. अमोल पाटील यांनी झाडांची प्रार्थना सांगून ते करत असलेल्या २२ उपक्रमांची माहिती दिली. या संस्थेला महालक्ष्मी देवराईला चिल्लर पार्टीतर्फे औषधी वनस्पतींची १२ रोपे देऊन गौरवण्यात आले. यावेळी विशाल पाटील, नीलिमा पाटील, प्रकश जगदाळे, अमोल चरणकर, ईशान महालकरी, ओंकार कांबळे, शिवप्रभा लाड, पद्मश्री दवे, अभय बकरे, मिलिंद कोपर्डेकर उपस्थित होते.

‘द मॅजिक एलिफंट’ने उघडला महोत्सवाचा पडदा…

‘द मॅजिक एलिफंट’ने महोत्सवाचा पडदा उघडला. पहिल्या दिवशीच्या तीन चित्रपटांना महापालिकेच्या ३० शाळांमधील १५०० बाल प्रेक्षकांची हजेरी लावली. दुपारी हॉप आणि लिटल मर्मेड हे चित्रपट दाखवण्यात आले. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता रिम ऑफ द वर्ल्ड, १०.३० वाजता हेल्प आय श्रींक माय टीचर, आणि दुपारी १ वाजता छुपा हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. या महोत्सवाचा समारोप २२ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव उपस्थित राहणार आहेत.

मुलांनी जमा केले कुरकुरे…

उद्घाटन सत्रात यादव यांनी कुरकुरे न खाण्याचे आवाहन केले. तसेच ज्या मुलांनी कुरकुरे आणले त्यांना ते जमा करण्याचे आवाहन केले. अनेकांनी रंगमंचावर येऊन कुरकुरे न खाण्याची शपथ घेत ते एकत्र जमा केले. यावेळी वीर कक्क्यय शाळेत वर्षभरापासून कुरकुरे खाण्यावर बंदी असल्याचे सांगणाऱ्या विद्यार्थ्याचा रवींद्र शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुखवट्यानी वेधले लक्ष…

आनंदाचे प्रतीक म्हणून कागदी मुखवटे हा यंदाच्या महोत्सवाचा विशेष लोगो सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी तयार करून आणले होते याची प्रदर्शन शाहू स्मारक भवनच्या आवारात करण्यात आले होते. मुखवटे परिधान केलेले बाल प्रेक्षक लक्ष वेधून घेत होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.