विभागीय व्यवस्थापक पुनीत द्विवेदी यांच्या हस्ते नवीन शाखांचा नुकताच शुभारंभ
कोल्हापूर – बँक ऑफ इंडियाच्या ताराबाई पार्क (कोल्हापूर) आणि इचलकरंजी येथील नवीन शाखांचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. ताराबाई पार्क येथील शाखेचे उद्घाटन भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर सौ. उषा थोरात यांच्या हस्ते संपन्न झाले. सौ. उषा थोरात यांनी २००५ ते २०१० या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर म्हणून कार्यभार सांभाळला आहे. याप्रसंगी त्यांनी बँकिंग सेवा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ग्राहकांना उत्कृष्ट सेवा प्रदान करण्यासाठी बँक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच, इचलकरंजी येथील नवीन शाखेचे उद्घाटन विभागीय व्यवस्थापक पुनीत द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उप-विभागीय व्यवस्थापक विशाल कुमार सिंह, सुनील खरे, ज्योती कुमार सिंह आणि बँकेचे प्रमुख ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना विभागीय व्यवस्थापक पुनीत द्विवेदी यांनी नागरिकांना या नवीन शाखांद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या बँकिंग सेवांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. “कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांत आता बँकेचा विस्तार ९० शाखांपर्यंत झाला असून, उत्कृष्ट ग्राहक सेवा देण्यासाठी बँक कटिबद्ध आहे,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

















































