विनायक जितकर
आमदार प्रकाश आबिटकर यांची तारांकित प्रश्नाद्वारे विधानसभेत मागणी…
कोल्हापूर – राज्यातील अनेक राष्ट्रीय आणि राज्य मार्गावर गेली अनेक वर्षापासून टोल वसूली सुरू आहे. या टोल वसुलीमध्ये जमा होणाऱ्या रक्कमेचे पुढे काय होते हाच मोठा झोल आहे. यामुळे राज्यातील टोल वसुलीची स्वतंत्र चौकशी समिती नेमून चौकशी करा अशी आग्रही मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेमध्ये उपस्थित प्रश्नाद्वारे केली.
![]() |
![]() |
यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्गावरील किणी व तासवडे येथील टोल नाक्यांवर बेकायदेशीर टोल वसुली होत आहे. या दोन्ही टोल नाक्यांवर टोल वसुलीकरीता 20 वर्षाची मुदत होती. या टोल नाक्यावर एकूण 3245 हजार कोटी खर्चापैकी आज पर्यंत 1902 हजार कोटी रुपये वसूली झाली असल्याचे कंपनीचे म्हणने आहे. परंतू किती टोल वसूल झाला याबाबत कोणतीही मोजमाप करणारी यंत्रणा नसल्यामुळे टोल नाके म्हणजे लूट असणारे सेंटर्स झाली आहेत. यामुळे राज्यातील सर्व टोल वसूलीची चौकशी करण्याकरीता स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करून सभागृहासमोर अहवाल सादर करावा अशी आग्रही त्यांनी केली. तसेच टोल नाक्यांवर असणाऱ्या नियमांची अंमलबजावणी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून होत नसल्यामुळे नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो. यामुळे एक चांगल्या प्रकारची स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर (कार्यप्रणाली) करण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी उत्तर देताना बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, राज्यातील टोलवसुली संदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असणारे रस्ते आपण त्या-त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले. त्यांच्या आणि आमच्या धोरणांत प्रचंड मोठी तफावत आहे. जो टोल वीस वर्षांत वसूल करणे अपेक्षित होते. तो टोल 1 हजार 900 कोटीत वसूल झाला. त्या वसुलीच्या संदर्भात ज्यांना कुणाला ठेके दिले होते. त्याची सर्व माहिती पटलावर ठेवली जाईल, असे मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले.