गोपाळ मारवाडी
शिरपूर मर्चंट्स को-ऑप बँक मॅनेजरने माहिती लपविण्याचे रहस्य काय?
शिरपूर – दि शिरपूर मर्चंट्स को-ऑप बँक लि. चे रोज नवे नवे घोटाळे उघडकीस आल्याने तालुक्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. व्यवस्थापक संजय कुलकर्णी आणि तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापन यांच्यावर ‘बँक बचाव समिती’ने योग्य माहिती न देता घोटाळ्यांवर पांघरूण घालण्याचे जे आरोप केलेले आहेत किंवा केले जात आहेत, ते आता सातत्याने खरे सिध्द होताना दिसत आहे. त्यामुळे ठेवीदारांमध्येही घबराट पसरली आहे. नियमबाह्य कर्ज प्रकरणांत अशी नवीन माहिती प्राप्त झाली आहे की, सहकार आयुक्त पुणे यांच्या सूचनेवरून जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशानुसार शासनाचे प्रथम श्रेणी लेखापरीक्षक धीरज चौधरी यांनी या बँकेने अनियमित पद्धतीने कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद कर्ज वाटपाचे चाचणी लेखापरीक्षण आज 6 डिसेंबर 2023 पासून सुरू केले आहे ज्याचे ‘बँक बचाव समिती’ने स्वागत केले आहे.
दरम्यान, ‘बँक बचाव समिती’ने एका महिला संचालिकेच्या सख्ख्या दिराला 50 लाखांहून अधिकचे कर्ज वाटप केल्याचे प्रकरण समोर आले आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून ‘बँक बचाव समिती’कडून बँकेत अनियमित कर्ज वाटप करून कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराबाबत लेखी माहिती मागवली जात आहे. तरीही गोपनीयतेच्या नावाखाली गैरप्रकारांना संरक्षण देण्याचे प्रकार मॅनेजर आणि संबंधितांनी सुरूच ठेवले होते, हे आता सिद्ध होत आहे. तक्रारदारांना हरप्रकारे त्रास देणे आणि घोटाळेबाजांना संरक्षण देणे हाच उद्योग या बँकेचे व्यवस्थापक संजय कुलकर्णी आणि त्याची पाठराखण करणार्यांचा एकमेव अजेंडा दिसतो. पण जर पापाचे घडे भरले असेल तर ते आपोआपच फूटते आहे. या नवीन पराक्रमात, एक महिला संचालिका पूनम राजेश भंडारी यांचे पती राजेश एकनाथ भंडारी यांचे सख्खे लहान बंधू सचिन एकनाथ भंडारी म्हणजेच सख्खे दीर यांनी 2021 मध्ये सुमारे अर्धा कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
या प्रकरणात व्यवस्थापक संजय कुलकर्णी, तत्कालीन चेअरमन आणि संबंधित कर्ज अधिकारी आणि व्यवस्थापनाने याबाबत डोळेझाक का केली? यात काही निहित वैयक्तिक आर्थिक हितसंबंध गुंतले होते का किंवा अशी अनेक प्रकरणे या बँकेत वर्षानुवर्षे सुरू होती? आता चाचणी लेखापरीक्षण पथक तपास करत आहे. तर अशी अपेक्षा आहे की ते दोषींवर त्वरित कारवाई करेल आणि संबंधित प्रत्येकाला जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करेल. सोबतच्या चित्रात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये हे स्पष्ट होत आहे कि संचालिकेच्या रक्त नातेवाईकाच्या नांवे कर्ज वितरण केले गेले.
सहकार खात्याला या बँकेत झालेल्या अनेक नियमबाह्य पद्धतीने कर्ज वितरण घोटाळ्यांबाबतच्या कारणांचा खोलवर विचार करावा लागेल, तरच कोट्यवधी रुपयांच्या खैरातीप्रमाणे कर्ज वाटपात झालेल्या गैरव्यवहाराला जबाबदार असलेले दोषी पकडले जातील, अशी मागणी बँक बचाव समितीचे पदाधिकारी मोहन साहेबराव पाटील, गोपाल के. मारवाडी, ओंकार आबा जाधव, भरत रोकडे, हिरालाल रामराव कोळी, डॉ. सरोजताई पाटील आदींनी केली आहे. या संदर्भात समितीने डीडीआर कार्यालय आणि सहकार आयुक्त, पुणे यांच्याकडे सुध्दा तक्रार केली आहे. लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात येईल असे सांगितले आहे. शिरपुरला आलेल्या लेखापरीक्षण पथकाचे प्रमुख संजय ऐंडाईत यांनी तक्रारदारांना आश्वासन दिले आहे कि, कोणत्याही संशयास्पद प्रकरणात दोषी आढळल्यास कितीही मोठी व्यक्ती असली तरी संबंधितांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल.