लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या – प्रा. शहाजी कांबळे यांची स्पष्ट भूमिका
महामंडळासाठी एक हजार कोटींचा निधी, विद्यापीठात अध्यासन आणि कोल्हापुरात पूर्णाकृती पुतळा उभारा
कोल्हापूर –(रुपेश आठवले)
साहित्य, समतेचा लढा आणि विद्रोही लेखणीतून दबलेल्या समाजाला शब्दरूप देणारे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती कोल्हापुरात मोठ्या उत्साहात साजरी झाली. या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात प्रा. शहाजी कांबळे यांनी अण्णाभाऊंच्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची मागणी केली.
त्यांनी सांगितले की, “अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील दलित, शोषित, उपेक्षित वर्गाच्या व्यथा जगाच्या पल्याड पोहोचवल्या. ‘फकीर’सारख्या कादंबऱ्यांतून त्यांनी जातपात, विषमता, गरिबी यांविरोधातील संघर्ष मांडला. अशा महान कार्याची दखल घेत **भारत सरकारने अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार देणे ही काळाची गरज आहे.”
त्याचबरोबर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळासाठी 1000 कोटी रुपये निधी जाहीर करावा, शिवाजी विद्यापीठात शासनमान्य ‘अण्णाभाऊ साठे अध्यासन’ सुरू करावे, आणि कोल्हापूर शहरात त्यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारावा, अशा मागण्यांची त्यांनी यावेळी ठाम मांडणी केली.
या सर्व मागण्यांना कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार राजेश क्षीरसागर यांनीही आपला पाठिंबा दर्शवला. “येणाऱ्या अधिवेशनात अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा यासाठी लक्षवेधी सूचना मांडून केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवू,” अशी घोषणा त्यांनी केली.
कार्यक्रमात प्रा. प्रकाश नाईक यांनी अण्णाभाऊंच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानावर भाष्य करत मार्गदर्शन केले. अध्यक्ष रणजीत कवाळे, अॅड. प्रमोद दाभाडे (सचिव), आनंदराव कुरडे, अमोल माने (माजी नगरसेवक), बाळासाहेब भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. दादासाहेब माने यांनी संयोजन व स्वागतपर प्रस्ताविकेत स्मृतीशेष किशोर माने यांच्या आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमाचे आयोजन बहुजन दलित सेना यांच्या वतीने करण्यात आले होते. अण्णाभाऊंच्या कार्यावर आधारित फलक, पुष्पहारांनी सजवलेले त्यांच्या प्रतिमांचे पूजन, आणि विचारमंथनाने कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.