काेल्हापूरः कोल्हापुरातील सृजन आनंद विद्यालय हे त्याच्या प्रयोगशील शिक्षणासाठी ओळखले जाते. 15 ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सृजन आनंद विद्यालयात विवेकानंद महाविद्यालयाचे प्रा.डॉ अभिजीत पाटील यांचा ‘चला डोक्यात दगड भरूया’ या वैशिष्ट्यपूर्ण दगडांचा संग्रह प्रदर्शित करण्यात आला. आपल्या अवतीभवती असंख्य प्रकारचे दगड असतात. ते आपल्या दैनंदिन जीवनाचा पाया आहेत. स्वयंपाकघर, बांधकाम ते अनेक उद्योगांमध्ये त्यांची भूमिका महत्वाची आहे. हे दगड पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती आपल्याला देत असतात. तिच्या निर्मितीची प्रक्रिया समजून सांगत असतात. काळाच्या उदरात दडलेले सत्य प्रकाशात आणत असतात. अशा प्रकारे मुलांना दगडाकडे बघण्याची दृष्टी मिळावी व त्यांचा शास्त्रीय दृष्टिकोन तयार व्हावा म्हणून या प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
प्रा अभिजीत पाटील व प्रा योगिता पाटील यांच्या संग्रहातील अग्निजन्य खडक, स्तरित खडक, रूपांतरित खडक, स्फटिके, प्रवाळ असे अनेक दुर्मिळ दगड मुलांना यावेळी पाहायला मिळाले. या संग्रहात वनस्पतीजन्य जीवाश्म, प्राणीजन्य जीवाश्म, डायनासोरच्या हाडंचे जीवाश्म होते. या प्रदर्शनाच्या निमित्याने एका निसर्ग विज्ञान शाखेच्या परिचय मुलांना झाला. संग्रह पाहण्यासाठी आणि भूविज्ञानाची ओळख करून घेण्यासाठी विद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
या संग्रहाबरोबर विद्यालयातील मुलांच्या संग्रहांचेही प्रदर्शन भरवण्यात आले होते. दगड, शंख शिंपले, पक्षांची पिसे, किचेन्स, गाड्या, चित्रसंग्रह, वनस्पतींची पाने, वेगवेगळ्या धबधब्यांचे पाणी, जुन्या पितळी वस्तू, ग्रामोफोन आणि त्याच्या रेकॉर्ड्स असे जवळजवळ ८० संग्रह मांडले गेले होते. त्यातून मुलांच्या शोधकतेला प्रोत्साहन मिळाले. कोणताही छंद जोपासतांना ध्यास घ्यावा लागतो अशी वृत्ती तयार होण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरला. या खरीप हंगामात विद्यालयाने तांदळाच्या पन्नास जातींची पेरणी केलेली आहे. त्या बियाणांचाही संग्रह लक्षवेधक ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय भाषांच्या गाण्यांनी झाली. यात तमिळ, हिंदी, कानडी, गुजराती, बंगाली, मराठी अशा विविध भाषांमधील जोशपूर्ण गाणी मुलांनी गायली. भाषिक विविधता हे भारताचे सामर्थ्य आहे, सौंदर्य आहे याची प्रचिती आली.